खडसंगी : एकेकाळी रोजगार देणारे अशी ओळख असलेल्या खडसंगी येथील तरुणांना आता रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. दूधसंकलन केंद्र, कवेलू फॅक्टरी बंद पडल्याने रोजगार हिरावले. शिवाय खडसंगीतील जनतेची आर्थिक घडी विस्कटली आहे.
चिमूर तालुक्यातील खडसंगी हे गाव चिमूर-वरोरा मार्गावर आहे. एकेकाळी परिसरातील लोकांना रोजगार देणारे गाव म्हणून हे परिचित होते.
ताडोबा गेटच्या मार्गांवरील शासकीय दूधसंकलन केंद्र, चिमूर-वरोरा मार्गावर असलेले कापूस जिनिंग प्रेसिंग आणि कवेलू फॅक्टरी हे महत्त्वाचे रोजगार देणारे मोठे उद्योग होते. खडसंगी येथे नव्वदच्या दशकात रोजगारासाठी आलेले अनेक कुटुंबे कायमची स्थायिक झाली. अनेकांना चांगला रोजगार मिळाला. मात्र काही वर्षांनी एकापाठोपाठ एकेक उद्योग बंद पडत गेले. स्थानिकांचा रोजगार हिरावला गेला. येथील तिन्ही उद्योगांमध्ये ५०० लोकांना नियमित काम मिळाले होते. कापूस जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी सोसायटीमार्फत चालविली जात होती. कापूस विकण्यासाठी हजारो शेतकरी येत होते. शेतकऱ्याचा नंबर लागण्यासाठी एकेक महिना लागायचा. शेतकऱ्यांना मुक्कामी राहावे लागायचे. तरुणांनी रस्त्याच्या कडेला उपाहारगृह सुरू करून रोजगार मिळाला होता. आता रोजगारासाठी येथील युवकांना बाहेरगावी जावे लागत आहे. शासनाने चिमूर तालुक्यात मोठे उद्योग केंद्र उभारून बेरोजगार लोकांना द्यावी, अशी मागणी येथील बेरोजगारांनी केली आहे.