मारोडा : पाऊस पूर्णत: गायब झाल्यामुळे शेतकरी वर्ग उदास झालेला असून शेतात पाणी देण्यासाठी काठी व घोंगडा घेऊन शेतकऱ्यांना रात्रभर भटकंती करावी लागत आहे.मारोडा हा परिसर तसा धानपीकांसाठी वाईट नाही. मूल शहरात धानाची बाजारपेठ आहे. मारोडा, उश्राळा, भादुर्णी, करवन, काटवन, कोसंबी, परझडी, सोमनाथ ही गावे सोमनाथची झरणं, उमा नदी व नलेश्वरच्या पाण्याने सुजलाम सुफलामच असतात. यास गाव तलावाची साथ मिळते. त्यामुळे मच्छीपालनातही अनेकजण गुंतले आहेत. परंतु त्यासाठी वरच्या पाण्याची गरज असते. मुबलक पाऊस दोन-चारदा पडला की उमा वाहू लागते. झरणं फुटू लागतात. यावर्षी तसे काही घडले नाही. उमा नदीला पूरच आला नाही. आलेल्या पावसामुळे झरणं ओसंडून वाहिली नाहीत. त्यामुळे शेताला पाणी कमी पडू लागलेला आहे. रात्रभर शेतकरी कुणी दुसरा चोरुन नेऊ नये म्हणून पाण्यासाठी हातात काठी व खांद्यावर घोंगडे घेऊन फिरत आहे. रात्रभर हे शेतकरी नलेश्वरच्या शेवटच्या कालव्याचे पाणी घेण्याकरिता अनेक मैल भटकत असतात. उमा कोरडी पडत आहेत. मोटारपंपाच्या फुटबालपर्यंत होडातून कालवे, खड्डे खोदलेले आहेत. लाखो रुपये गुंंतवून केलेल्या धानशेतीला जगविणे जीवन मरणाचा प्रश्न आहे. शासन स्थीर आहे. वरुणराजा रुसलेला आहे. अशा स्थितीत त्यांनी कोणाकडून न्याय मागावा, हा त्यांचा प्रश्न आहे. (वार्ताहर)
धानपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची शेतात रात्रभर भटकंती
By admin | Updated: October 19, 2015 01:41 IST