विरुर (स्टे.) : आंध्र- महाराष्ट्र सीमेवरील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील दहा वर्षापासून शासन दरबारी धूळ खात पडला होता. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना कोसोदूर जाऊन आरोग्याची तपासणी करावी लागत आहे. त्यामुळे विरुर (स्टे) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांची नितांत आवश्यकता असल्याने येथे प्राथमिक आरोग्य व्हावे, या मागणीसाठी विरुर व विरुर परिसरातील जनतेने शासनाकडे वारंवार निवेदने दिली. मागण्या केल्या. परंतु त्या निवेदनाला शासनाने केराची टोपली दाखविली. परंतु जनप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नाने आता विरुर (स्टे.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र होण्याकरिता मंत्रालयाने हिरवी झेंडी दाखविल्याने परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र दीड वर्षाचा कालावधी लोटूनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला अजूनही सुरुवात न झाल्याने परिसरातील नागरिकांत विरुर प्राथमिक आरोग्य केंद्र कधी होणार, असा सवाल करीत आहे.ग्रामीण भागाचा विकास करीत असल्याचा दिंडोरा पिटणाऱ्या शासनाकडूनच नागरिकांच्या अनेक गंभीर समस्यांकडे डोळेझाक केली जात होती. तालुक्यात विरुर (स्टे.) हे गाव मोठे असून येथील लोकसंख्या आठ हजाराच्या वर आहे. येथे आठवडी बाजार भरतो. तसेच येथे वन कार्यालय, रेल्वे स्थानक, विद्यालय, महाविद्यालय, पोलीस ठाणे आदी सुखसुविधा आहेत. तसेच या गावाला ३५ ते ४० खेडे जोडलेले आहे. परंतु येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने परिसरातील गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात अतोनात रक्कम मोजावी लागत असल्याचे चित्र दिसत होते. विरुर येथे पोलीस ठाणे असल्याने पोलीस विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्राची कधीही आवश्यक्ता भासते. पोलीस विभागाला आरोपींना दवाखान्यात न्यावयाचे असल्यास विरुरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागते. हा भाग नक्षलग्रस्त अतिसंवदेनशील भाग असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरुन दुसऱ्या ठिकाणच्या आरोग्य केंद्रात जावे लागते. सन १९९४ मध्ये विरुर पोलीस ठाण्यावर नक्षल्यांनी हल्ला चढविला. त्यानंतर जवळच असलेल्या माकुडी रेल्वे स्थानकावर नक्षलांनी हल्ला चढविला. त्यामुळे हा भाग नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. काही विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी यापूर्वी अनेकदा शासनदरबारी निवेदने दिले. परंतु त्या निवेदनाला शासनाने केराची टोपली दाखविली. मात्र लोकप्रतिनिधीने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन विरुर (स्टे.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर व्हावे, अशी मागणी रेटून धरली.त्यामुळे मंत्रालयाने विरुर (स्टे.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र होण्याकरिता हिरवी झेंडी दाखविल्याने परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दीड वर्षाचा कालावधी लोटूनही विरुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पाणी कुठे तरी मुरत असल्याची ओरड विरुर परिसरातील नागरिक करीत आहे. (वार्ताहर)
विरूरला आरोग्य केंद्राची प्रतीक्षा
By admin | Updated: May 21, 2015 01:27 IST