शेतकऱ्यांच्या कार्यालयात चकरा : अनुदान देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : तालुका परिसरामध्ये धडक ंिसंचन योजनंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विहिरीचे बांधकाम केले. सदर कामात स्वत:जवळील रक्कमेची गुंतवणुक करुन काम पूर्ण केले. परंतु पं.स. पोंभुर्णाकडून अनुदान मिळण्यासाठी विलंब होत असल्याने आणि सद्य:स्थितीत पावसाळा बऱ्याप्रमाणे सुरुवात झाल्याने शेती हंगामासाठी पैसे कुठून आणायचे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरीत अनुदान देऊन अनुदानासाठी शेतकऱ्यांची होणारी पायपीट थांबवावी, अशी मागणी स्थानिक परिसरातील सिंचन विहीर लाभार्थी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शासनाने ग्रामीण भागातील सिंचन व्यवस्था बळकट करण्याच्या हेतूने मागेल त्याला शंभर टक्के अनुदानावर विहिर देण्याचे घोषित केले. त्यामुळे तालुक्यातील ५९८ शेतकऱ्यांनी विहिरीसाठी अर्ज केले त्यानुसार ४६९ विहिरींचे कार्यारंभ आदेश तयार झाले. तर ४१४ सिंचन विहिरीचे ले-आऊट देण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील २६० विहिरीचे बांधकाम प्रगती पथावर असून आठवडा भरामध्ये पूर्ण बांधकाम होणार असल्याचे पं.स. पोंभुर्णाकडून सांगण्यात येत आहे. एकाच वेळी संपूर्ण विहीरींची बांधकाम सुरु असल्याने पाहिजे त्या प्रमाणात बांधकाम करणारे मिस्त्री उपलब्ध होत नसल्याने काही विहिरीचे काम पूर्ण झाले नाही. त्यातच पावसाळ्याला सुरुवात झाल्याने उर्वरीत शेतकऱ्यांनी पुढील वर्षात बांधकाम करणार असल्याचे समजते. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी अपाल्या शेतातील विहिरीचे काम शंभर टक्के पूर्ण केले आहे. त्यांना त्यांचे अनुदान तत्काळ देणे गरजेचे असताना शासकीय दिरंगाईमुळे अनुदानास विलंब होत आहे. त्यामुळे स्थानिक परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांकडे बांधकाम करणारे मजूर व मिस्त्री चकरा मारीत आहेत. तसेच साहित्य पुरवठा करणारे दुकानदारसुद्धा तगादा लावीत आहेत. पावसाळ्यास सुरुवात झाल्याने संबंधीत लाभार्थी शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीकडे लागले असून बांधकाम करणारे मजूर मात्र त्यांना वेठीस धरीत आहेत.विहिरीचे काम पूर्ण झाले अशा लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ अनुदानाची रक्कम देण्यात यावी अशी स्थानिक परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांची मागणी आहे.
सिंचन विहिर योजनेच्या अनुदानाची प्रतीक्षा
By admin | Updated: June 16, 2017 00:41 IST