कोरपना : निसर्गरम्य माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेले घाटराई देवस्थान व परिसर विकासापासून वंचितच आहे. त्यामुळे येथील विकास साधण्यात यावा, अशी अपेक्षा भाविक व पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.
तीर्थक्षेत्र असलेल्या घाटराई येथील हातलोनी गावापासूनचा मार्ग अतिशय खडतर आहे. त्यामुळे तारेवरची कसरत करत नागरिकांना येथे पोहोचावे लागते. या रस्त्यावरील नाल्यावर पूल नसल्याने चारचाकी वाहनधारकांना जोखमीचे ठरते आहे. या ठिकाणी असलेल्या भक्त निवासाचीही अत्यंत दुरवस्था झाली असून दारे, खिडक्या तुटल्या गेल्या आहे. या स्थानी हातलोनी मार्गावर भव्य प्रवेशद्वार, सामाजिक सभागृह, परिसराचे सुशोभीकरण, निसर्गरम्य ठिकाण असल्याने मनोरंजन पार्क, वन-उद्यान आदींची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी आहे. तसेच रस्त्यावर घाटराई देवस्थान मार्ग दर्शविणारे फलक लावण्यात यावे, जेणेकरून नवीन व्यक्तींना स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी सोयीचे होईल. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावर पर्यटन विकास महामंडळ यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.