लोकवर्गणीतून केली मदत
विरूर स्टेशन : कोरोनाबधितांची संख्या शहरी भागात आता जरी कमी होत असली तरी ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत असल्याने गरीब जनतेला ऑक्सिजन बेड मिळणे कठीण आहे. खासगी रुग्णालयात बेड मिळाला तरी ग्रामीण भागातील गरीब जनतेला लाखो रुपये मोजावे लागतात.
त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सोई-सुविधांचा अभाव होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वात विरुर पोलिसांनी वर्गणी गोळा करून ७५ हजार रुपयांची मदत कोविड केअर सेंटरसाठी दिली.
सुविधांअभावी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला व आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहेच. विरुर येथील नागरिकांनी येथे नवीन कोविड सेंटर उभारून ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तेव्हा राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून विरुर येथील आशाधाम हॉस्पिटलला भेट देऊन १० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र निधीअभावी सदर सुविधा पुरविणे अशक्य असल्याने गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून मदत करण्याचे ठरविले. गावातील अनेकांनी मदत दिली. ही बाब विरुर पोलीस विभागाला कळताच विरुरचे ठाणेदार यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून सदर कामासाठी आर्थिक मदत करण्याचे ठरविले. शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वात विरुर पोलीस स्टेशनमध्ये ७५ हजार नगदी रुपये जमा करून विरुरचे सरपंच यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी ठाणेदार तिवारी, वडतकर, भाग्यश्री आत्राम, अजय रेड्डी, सुरेमद्रापाल सिंग बवेजा, मनोज सारडा, विलास आक्केवार व पोलीस कर्मचारी हजर होते.