घुग्घुस : चंद्रपूर-नागपूर रस्त्यावरील सेंट्रल एमआयडीसी ताडाळीच्या चमन इंडस्ट्रीज या लोखंड उत्पादन करणाऱ्या कारखान्यापासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने आजूबाजूच्या शेतपिकावर विपरीत परिणाम होत आहे. मानवी आरोग्यही बाधित होत आहे.
सदर कारखान्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, कारखान्याचे व्यवस्थापन यांच्याकडे वारंवार निवेदन देऊन लक्ष वेधले. मात्र या गंभीर समस्यांची दखल घेतली जात नाही, असा आरोप तक्रारीतून विरुरचे रमाकांत बलकी यांनी केला आहे.
ताडाळीमध्ये चमन, ग्रेस, गोपाणी, सिद्धबली व अनेक छोटेमोठे लोखंड उत्पादन व वीज प्रकल्प आहेत. त्यापासून अधिकांश कारखान्याच्या चिमण्यातून प्रदूषण होत आहे. त्या कारखान्याच्या परिसरातील शेतजमिनी खराब होत असून पीक उत्पादनाची क्षमता कमी झाली आहे. गाववासीयांना प्रदूषणाचा तडाखा बसला आहे. विविध आजार जडले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे विरुर गावच्या लोकांनी वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, प्रकल्पाचे व्यवस्थापन यांच्याकडे लेखी तक्रारी करून समस्या दूर करण्याची विंनती केली. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना अजूनही वेळ मिळालेला दिसत नाही. लोकप्रतिनिधींकडून आश्वासनाखेरीज काही मिळाले नाही. त्यामुळे आता शेवटी कठोर पावले उचलून आंदोलन करण्याचा इशारा रामेश्वर बलकी यांनी दिला आहे.