देवाडा खुर्द : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या सुविधा देण्यास ग्रामपंचायतीचे सचिव व संवर्ग विकास अधिकारी टाळाटाळ करीत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय देण्यास असमर्थ ठरत असल्याचा ठपका ठेऊन न्याय न मिळाल्यास अन्न त्याग आंदोलन करण्याचा इशारा सीईओंना दिलेल्या निवेदनाद्वारे कर्मचाऱ्यांनी दिला आहे.महाराष्ट्र शासनाच्या अधिनियम परिपत्रक क्र. ३५३३/०१३ दि. २१/९/०१३ अन्वये तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना सचिव, सरपंच यांच्याकडून शासनाच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवून अवमान केला जात आहे. ग्रामीणांच्या सेवा चाकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची थट्टा केली जात असून सुधारित किमान वेतनानुसार पगार देण्यात यावा, पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्यनिर्वाह निधी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, तालुक्यातील ६० ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सेवा अधिनियम पुस्तक सेवा पुस्तिका तयार करण्यास सचिवाकडून टाळाटाळ करुन कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे संबंधित सचिवांना याबाबत आदेश देण्यात यावे. ग्रामपंचायत कर्मचारी हा २४ तास काम करुन ग्रामीण जनतेच्या सानिध्यात ग्रामपंचायतीला नेहमी सेवा देत असतो. त्यांना कुशल कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत आपल्याकडून कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरुन कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये काम करण्यास बळ मिळेल, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार राहणीमान भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे आदेश असताना याकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. ते आम्हाला सेवेचा लाभ मिळवून देण्यास असमर्थता दर्शवितात. याबाबत विनाविलंब कार्यवाही अपेक्षीत आहे. वरील संपूर्ण बाबींची दखल घेऊन आम्हाला योग्य न्याय देण्यात यावा, अन्यथा ८ आॅगस्टपासून पोंभुर्णा पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. (वार्ताहर)
पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
By admin | Updated: August 6, 2014 23:46 IST