प्रत्येक विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी हे पद असते. मात्र गोंडवाना विद्यापीठात अद्याप हे पद भरण्यात आलेले नाही. ३ वर्षांपूर्वी हे पद भरण्याकरिता जाहिरात काढण्यात आली. परीक्षा व मुलाखत देखील घेण्यात आली. मात्र नियुक्ती करण्यात आली नाही. अपात्रतेचे कारण देण्यात आले. मात्र विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे हे पद रिक्त राहिल्याची चर्चा त्यावेळेस होती. कोरोनामुळे पुन्हा ही पदभरती रखडली होती. मागील महिन्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री गडचिरोलीला आले असताना हे पद भरण्यासंदर्भात आदेश दिले. त्यानुसार विद्यापीठाने वैद्यकीय अधिकारी, विधी अधिकारी व जनसंपर्क अधिकारी हे तीन पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासंदर्भात जाहिरात काढली, परंतु जनसंपर्क अधिकारी पदाकरिता केवळ १५ हजार वेतन ठेवण्यात आले. सोबतच केवळ ८९ दिवसांची कालमर्यादा घालण्यात आली. उर्वरित पदाकरिता मात्र सन्मानजनक वेतन व कालमर्यादा ठेवण्यात आली अशाप्रकारे पद भरती केल्यास विद्यापीठाला कौशल्यपूर्ण अधिकारी कसे मिळणार, असा सवालही प्रशांत दोंतुलवार यांनी निवेदनात केला आहे. वर्ग १ चे पद कंत्राटी पद्धतीने भरताना विद्यापीठाने त्यांना देण्यात येणाऱ्या वेतनासंदर्भात विचार करायला हवा. अत्यल्प वेतनावर चांगले अधिकारी मिळणार नाहीत. त्यामुळे या जाहिरातीत सुधारणा करून सन्मानजनक वेतनाची तरतूद करावी,याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
कोट
जनसंपर्क अधिकारी हे पद शासन मान्य आहे. शासन स्तरावरून सद्य स्थितीत पदभरती बंदी आहे. याबाबत संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी आढावा बैठकीत हे पद भरण्याकरिता लवकरच मंजुरीसाठी आश्वासित केल्याने या पदाकरिता कालमर्यादा घालून देण्यात आलेली आहे. शासनाच्या मंजुरीनंतर प्रक्रिया राबवून जनसंपर्क अधिकारी पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. हे पद सध्या कंत्राटी पद्धतीने ८९ दिवसांकरिता भरावे, असा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेला आहे.
-डॉ. अनिल चिताडे, कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.