२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांची संख्याही वाढली. आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाल्याने ४५ वर्षांवरील जास्त वयाच्या नागरिकांची संख्या मोठी झाली. त्यामुळे प्राधान्य गटातील सर्व नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागणार आहे. १७५ लसीकरण केंद्रांमध्ये सुमारे दोन हजार जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक तसेच अंगणवाडी सेविका, आशा, स्वयंसेवकांचाही समावेश आहे.
२ लाख ९५ हजार २३ जणांनी घेतली लस
जिल्ह्यात २३ एप्रिलपर्यंत २ लाख ९५ हजार २३ जणांनी लस घेतली.
४५ पेक्षा जास्त वयाचे व सहव्याधी असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आरोग्य प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार डोस उपलब्ध झाले असते तर आतापर्यंत सुमारे चार लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. मात्र,आठवड्यातून दोन ते तीन दिवस सलग लसीकरण केल्यानंतर तिसऱ्यादिवशी केंद्र बंद ठेवावे लागत आहे.
मागणी लाखाची, पण मिळतात हजार!
जिल्ह्यात दररोज सरासरी लसीकरण तीन ते चार हजार आहे. परंतु, मागणीनुसार लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे दोन दिवसातच लस संपून जाते. दररोज १० हजार डोस मिळाले, तरच लसीकरण आणखी वेगाने होऊ शकते. १ मेपासून १८ वर्षांवरील लसीकरण युद्धस्तरावर राबविण्याची चंद्रपूर मनपा व जिल्हा आरोग्य प्रशासनाची तयारी आहेत. परंतु, डोस किती मिळतात, यावरच अवलंबून राहणार आहे.
दुसऱ्या डोससाठी गोंधळ उडणार
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. दुसरा डोस १४ फेब्रुवारीपासून सुरू झाला. केंद्र सरकारने आता २८ दिवसांऐवजी सहा ते आठ आठवड्यानंतर दुसरा डोस घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे हजारो नागरिकांनाच दुसरा डोस पुढे गेला. त्यातच आता १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण घोषित झाल्याने केंद्रात गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
लसीकरणासाठी २३७ केंद्रे सज्ज
जिल्ह्यात सध्या १७५ लसीकरण केंद्रे सुरू आहेत. डोसच्या उपलब्धतेनुसार या केंद्रांचा वापर केला जातो. १ मार्चपासून अडचणी येऊ नये, यासाठी जिल्हाभरात २३७ केंद्रांचे नियोजन करण्यात आले. लस उपलब्ध झाल्यास ही सर्व केंद्रे सुरू करण्याची जिल्हा आरोग्य प्रशासनाची तयारी आहे. याशिवाय, खासगी केंद्रांचीही संख्या वाढू शकते. नागरिकांची अडचण होणार नाही, यादृष्टीने नियोजनाचा आराखडा तयार करून ठेवण्यात आला आहे, असा दावा जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यांनी केला.
चंद्रपूरला हवे दोन लाख ६२ हजार डोस
चंद्रपूर मनपा क्षेत्र अंतर्गत आतापर्यंत ४१ हजार ६८० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. १३ केंद्र कार्यरत आहेत. प्राधान्य वयोगटानुसार, सुमारे दोन लाख ६२ हजार ७०० जणांना डोस द्यावा लागणार आहे. मागणीनुसार डोस मिळाल्यास एक मार्चपासून ३५ केंद्रे सुरू होऊ शकतात. आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात मोहिमेसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांनी दिली.
लसीकरणासाठी पात्र नागरिक
६० वर्षांपुढील- २२४२९६
४५ ते ६०-४४८५८६
२५ ते ४४ - ६८४२९६
१८ ते २४- २८४८५२