सिंदेवाही : तालुका आणि शहरात कार्यरत अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे सिंदेवाही तालुक्यात अज्ञात आजाराची साथ पसरली आहे. कच्चे रस्ते, दूषित पाणी, सांडपाण्याच्या गटाराची नियमित स्वच्छता न करणे, रस्त्याच्याकडेला घाण करणे, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग यामुळे गावातत डेंग्युसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना विविध रोगाची लागण होत आहे. ग्रामपंचायतीचे अस्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याने डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. सिंदेवाही-लोनवाही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवीन वस्त्यामध्ये साधे रस्तेही नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अनेक वरस्त्यांपर्यंत पोहोचली नसल्याने तेथील नागरिकांना हातपंप व विहिरीचे पाणी प्यावे लागते. ज्या भागात विहिरीतून पाणी पुरवठा होतो त्या विहिरीमध्ये साधे ब्लिचिंग पावडरही टाकले जात नाही. त्यामुळे पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढते आहे. नव्या वसाहतीत कोणत्याच सोई सुविधा नाही. पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. त्यामुळे मार्ग मिळेल त्या मार्गाने पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. परिसरात शेकडो प्लॉट रिकामे असून प्लॉट व खुल्या जागामध्ये सांडपाणी साचून डासांची उत्पती होत आहे. सांडपाण्यात वराहाचा दिवसभर संचार असते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मलेरिया, मळमळ, अशक्तपणा, डोकेदुखी, टायफाईड व काविळ यासह अनेक आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. काही रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी मात्र, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नागरिकांत तिव्र असंतोष पसरला असून याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
सिंदेवाही तालुक्यात अज्ञात आजाराची साथ
By admin | Updated: November 8, 2014 01:05 IST