राजुरा : मागील सात दिवसांपासून वेकोलि व्यवस्थापनाच्या विरोधात सुरू असलेले प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण काल बुधवारी मध्यरात्री केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मध्यस्थीने सुटले.राजुरा तालुक्यातील धोपटाळा, साती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा, सुब्बई, चिंचोली येथील राजू मोहारे, विकास घटे, सोनु गाडगे, बाळू जुलमे, बालाजी पिंपळकर, रवींद्र बोबडे, पूष्पा बुधकरे, मुर्लीधर फटाले हे प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या समर्थनार्थ २०० शेतकरी साखळी उपोषण करीत होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर दुसऱ्यांदा बुधवारी मध्यरात्री १.३० वाजता राजुरा येथे पोहचले. त्यांनी उपोषणकर्त्यासोबत सविस्तर चर्चा केली. हा प्रकल्प मार्च महिन्याच्या बोर्ड मिटिंगमध्ये ठेऊन शक्य तितक्या लवकर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करु आणि फास्ट प्लस प्रकल्पासाठी ज्या जागा संपादित केल्या आहे, त्या ठिकाणी प्रकल्प उभारु. जमीनी परत देण्यासाठी जमिनी संपादीत केलेल्या नाही, मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वासन ना. हंसराज अहीर यांनी उपोषणकर्त्यांना दिले. याप्रसंगी राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या सेवेत तत्पर राहण्याचे सांगितले.याप्रसंगी उपोषणकर्त्याना निंबूपाणी देऊन उपोषणाचा सांगता करण्यात आली आणि रात्री २.३० वाजता केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर राजुरावरुन चंद्रपूरला गेले. याप्रसंगी वेकोलिचे उपमहाप्रबंधक एम. येलय्या, नियोजन अधिकारी मनोज नवले, प्रकल्पग्रस्ताचे प्रतिनिधी विजय चन्ने, चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे, राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी. यू. बोर्डेवार, भाजपाचे राजुरा विधानसभा क्षेत्र प्रमुख खुशाल बोंडे, राहुल सराफ राजू घरोटे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
केंद्रीय मंत्र्यांच्या मध्यस्थीने सुटले प्रकल्पग्रस्तांचे उपोषण
By admin | Updated: February 10, 2017 00:43 IST