चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा मतदार संघात नव्यानेच वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनची कार्यशैली नीट समजावून घ्या व मॉकपोल काळजीपूर्वक करा. त्यानंतर अडचण भासणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मतदान केंद्राधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. प्रियदर्शनी सभागृहात शनिवारी चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील केंद्राधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी संजय बघेल, राज्यस्तरिय प्रशिक्षक तेलंग, निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने, तहसिलदार गणेश शिंदे व स्वीपचे नोडल आॅफिसर सुरेश वानखेडे यावेळी उपस्थित होते. मिझोरम व छत्तीसगड येथील यशस्वीतेनंतर महाराष्ट्रात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होत असल्याने मतदारात याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. या प्रशिक्षणात अनेक मतदान केंद्राधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्हीव्हीपॅटचा प्रत्यक्ष वापर करून कार्यशैली समजावून घेतली.यावेळी प्रशिक्षक तेलंग म्हणाले, कोणाला मतदान केले याची खात्री व्हीव्हीपॅटमुळे मतदारांना होणार आहे. मात्र त्याची कुठलीही स्लीप व अथवा पावती दिली जाणार नाही. मतदान ईव्हीएम मशीनवरच होणार आहे. परंतु व्हीव्हीपॅटवर कोणाला मतदान केले, हे सात सेकंदापर्यंत पाहण्याची सोय असणार आहे. हे प्रशिक्षण अतिशय काळजीपूर्वक पूर्ण करा म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अडचण निर्माण होणार नाही.मॉकपोल केल्यानंतर त्यासंबंधीची सविस्तर माहिती फार्म १७ सी मध्ये नमूद करणे आवश्यक आहे असे सांगून तेलंग म्हणाले, मतदाराची तक्रार असल्यास त्याची नोंद घ्या. तक्रार खोटी निघाल्यास तक्रारकर्त्यास सहा महिन्यांची शिक्षा होवू शकते, ही बाब निदर्शनास आणून द्या. प्रत्येक व्हीव्हीपॅट मशीनसोबत मार्गदर्शक पुस्तिका देण्यात येणार असून ही पुस्तिका किमान तीनवेळा वाचावी, असा सल्ला संजय बघेल यांनी दिला.नव्यानेच सुरू केलेल्या व्हीव्हीपॅट मशीनविषयी मतदान अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता असली तरी हे यंत्र मतदारांना मतदानाची खात्री पटविण्यासाठी असून कुठलाही प्रयोग करण्यासाठी नाही हे लक्षात ठेवावे असे त्यांनी सांगितले. मतदान केल्याचे डिस्प्लेवर दिसल्यानंतर ती स्लीप ड्रॉपबॉक्समध्ये जमा होईल. थर्मल इमेजींग पेपरपासून विशेष डिझाईन केलेल्या या स्लीपची प्रिंट पाच वर्षापर्यंत टिकून राहू शकते हे विशेष. नागरिकांना केवळ बघायला मिळणार आहे. पावती मिळणार नाही ही बाब मतदारांना समजावून सांगण्याचा सल्ला त्यांनी दिला.यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अधिक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील मतदारांसाठी सुद्धा व्हीव्हीपॅटचे डेमो करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी व मतदारांनी उत्सुकतेपोटी व्हीव्हीपॅटच्या तक्रारी नोंदवू नये खरोखरच मतदान दुसऱ्याला गेले असेल अशा प्रसंगीच तक्रार नोंदवावी अन्यथा शिक्षा होईल याचे भान ठेवावे, असे आवाहन दैने यांनी केले. (प्रतिनिधी)
व्हीव्हीपॅटची कार्यशैली नीट समजून घ्या - म्हैसेकर
By admin | Updated: October 4, 2014 23:25 IST