लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नवीन चंद्रपूरलगतच्या कोसारा सर्व्हे क्रमांक १०४/२ येथे १८ मीटर रुंद डी. पी. लगत आरक्षण क्रमांक ५२ दुकान केंद्र या आरक्षित जागेवर विनापरवाना सिमेंट वीटभट्टी उभारण्यात आली आहे. याबाबत तक्रार प्राप्त होताच विशेष नियोजन प्राधिकरण (म्हाडा) ने संबंधित अतिक्रमणधारकाला दोनदा नोटीस बजावली. मात्र, संबंधिताकडून म्हाडाला उत्तर देण्याऐवजी नोटिशीला केराची टोपली दाखविल्याची धक्कादायक माहिती आहे. आता म्हाडा या अतिक्रमणधारकाला नतमस्तक होते वा ते अतिक्रमण हटविते, याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
अनधिकृतपणे उभारलेल्या सिमेंट वीटभट्टी परिसरात अनेक कुटुंब घरे बांधून राहात आहेत. या कुटुंबांना या वीटभट्टीमुळे प्रदूषणाचा त्रास वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील नागरिकांनी या वीटभट्टीबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. याआधारे म्हाडानेही संबंधित वीटभट्टीमालक सुभाष तुळशीराम पाऊणकर यांना नोटीस बजावली आहे. मात्र, पाऊणकर यांनी नोटीसीला केराची टोपली दाखवत अद्याप कोणतेही उत्तर सादर केले नाही. याबाबत काही तक्रारकर्त्यांनी म्हाडाचे नागपूरचे अधिकारी मेघमाळे यांच्याशी तक्रारीबाबत विचारणा केली असता त्यांनी नोटीसीला उत्तर मिळालेले नाही. आता तुम्हीच सांगा, काय कारवाई करू, अशी हतबलता व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रदूषणात आणखी भरचंद्रपूर आधीच प्रदूषित शहर म्हणून ओळखले जाते. अशातच वस्तीच्या परिसरात अनधिकृतपणे सिमेंट वीटभट्टी उभारल्याने येथून उडणारी सिमेंटची भुकटी नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करीत असल्याची नागरिकांची ओरड आहे. म्हाडाच अतिक्रमणधारकांपुढे हात टेकत असेल, तर तक्रार कोणाकडे बघायचे, असा सवाल उपस्थित होत आहे.