वनविभागाचे मनुष्यबळ खर्ची : बोंड येथील अतिक्रमण हटाव प्रकरण घनश्याम नवघडे नागभीडबोंड येथील संरक्षित जंगलाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याला आता चार दिवस उलटले आहेत. मात्र या घटनेतील कवित्वाची अद्यापही लोक चर्चा करीत आहेत. हे अतिक्रमण हटविण्यासाठी शासकीय यंत्रणेचे मोठे मनुष्यबळ खर्ची पडलेच. पण, त्याचबरोबर वनविभागाला दोन लाख रूपये खर्च करावे लागल्याची माहिती समोर आली आहे. बोंड येथील जवळपास ३१ शेतकऱ्यांनी तेथील संरक्षित जंगलात ३१ हेक्टर जागेवर अतिक्रमण केले होते. जवळपास तीन ते चार महिन्यांपासून हे अतिक्रमण सुरु होते. असे असले तरी स्थानिक वनकर्मचाऱ्यांनी होत असलेल्या या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हे अतिक्रमण वाढतच गेले आणि एक-दोन नाही तर तब्बल ३१ हेक्टर म्हणजेच शंभर एकरावर हे अतिक्रमण झाले.दरम्यान तळोधी (बाळा.) येथे वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून अभिलाषा सोनटक्के रुजू झाल्या आणि त्यांचे पेट्रोलींग दरम्यान या अतिक्रणाकडे लक्ष गेले. याबाबत त्यांनी सर्व माहिती गोळा करुन अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कार्यवाही सुरु केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मागितली आणि हे अतिक्रमण हटविण्यात आले.हे अतिक्रमण हटविण्यात आले असले तरी यातील कवित्व अद्यापही कायम आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी किती मनुष्यबळाचा वापर करण्यात आला, हे अतिक्रमण हटविण्यासाठी कोणत्या, कोणत्या विभागाची मदत झाली आणि यावर किती खर्च आला, असावा याचे ठोकताळे लोक अजूनही मांडताना दिसत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार अतिक्रमण हटविण्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी जातीने हजर होते. त्यांनी या कामासाठी पूर्ण दिवसाचे योगदान दिले. कार्यालयीन कामकाजाचे हे महत्त्वाचे दिवस असूनही त्यांनी दिलेल्या योगदानाची कर्मचारी वर्गात अजूनही चर्चा सुरु आहे. असे असले तरी हे अतिक्रमण हटविण्यासाठी वनविभागाला आर्थिक झळ सोसावी लागली, ते तर वेगळेच. हे अतिक्रमण वेळीच थांबविले असते तर, ही वेळ आली नसती, अशा प्रतिक्रियाही नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.अतिक्रमण हटविण्यासाठी आम्हाला महसूल विभाग, पोलीस विभाग यांचे मोालाचे सहकार्य लाभले. आर्थिक बाबीचा विचार केला तर हे अतिक्रमण हटविण्यासाठी दीड ते दोन लाखाच्या दरम्यान खर्च आला.- आशिष ठाकरे, डीएफओ, ब्रह्मपुरी.]
अतिक्रमण हटविण्यासाठी दोन लाखांचा भुर्दंड
By admin | Updated: June 29, 2016 01:08 IST