वरोरा : शहरात दिवसा चोरटे सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांत चोरट्यांनी भरदिवसा दोन घरे फोडून हजारो रुपये रोख व लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
वरोरा शहरालगतच्या हेलन केलरनगरमध्ये जसवंत भैयालाल सरियाम हे रविवारी दुपारी चंद्रपूरला गेले होते. त्यांच्या पत्नी कामाला गेल्याने दुपारी घरी कोणी नव्हते. त्यावेळी चोरट्यांनी समोरील दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील ६३ हजार रुपये व दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल होताच श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले; परंतु त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे समजते. दुसरी घटना मालवीय वाॅर्डात घडली. सुनील जवादे त्यांच्या घरी सोमवारी दुपारी कोणी नसल्याचे बघत चोरट्यांनी प्रवेश करून घरातील १७ हजार रुपये रोख व सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. भरदिवसा चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.