सावली : तालुक्यातील कोंडेखल येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली. फिर्यादी महिलेच्या बयाणावरून तीन आरोपीना सावली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारला रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. एकीकडे ही घटना राजकीय वादातून घडल्याचे सांगितले जात आहे तर, दुसरीकडे दारूबंदीच्या कार्यातून ही घटना घडल्याचा आरोप महिलांकडून होत आहे. मारोती भाऊराव घोडे (३४), लिंगु सोमा घोडे (५५), सुरज रवींद्र ठाकूर (२१) सर्व रा. कोंडेखल अशी आरोपींची नावे आहेत. सावलीच्या ठाणेदारांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडेखल येथील पोलीस पाटील योगराज डोमा घोडे यांचा मुलांचा लग्न मांडव वाढणीच्या कामासाठी कालीदास घोडे यांच्याकडे होता. काही इसम शेतातून पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत होते. त्या दरम्यान विरूद्ध बाजूच्या नागरिकांनी पाईपलाईन काढावी अशी मागणी केली. वाद वाढत जावून प्रकरण शिविगाळीवरून हाणामारीवर आले. फिर्यादी प्रतिमा मुकुंदा संदोकर (२५) व काही महिलांनी सावली पोलिसात तक्रार केली, आरोपीना रात्रीच ताब्यात घेतले व कलम ३२४, ३२३, ३४/५०३, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. काही आरोपी फरार आहेत. (तालुका प्रतिनिधी)सदर आरोपी गावात दारूबंदीनंतरही अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करतात. दारूविक्री करीत असल्याची माहिती गावातील महिला मंडळ व सदर फिर्यादीला मिळताच अवैध दारू विक्रेत्याचे घर गाठले असता आरोपीनी महिलांच्या अंगावर धावत येऊन चाकूचा हल्ला केला. फिर्यादी महिला जखमी आहे. हातावर चाकूचा वार आहे. उपचार सुरू आहे, असे फिर्यादी महिला व इतर महिलांचे म्हणणे आहे.
दोन गटात हाणामारी, महिलांना मारहाण
By admin | Updated: May 17, 2016 00:35 IST