विसापूर : विसापूर बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव. १७ सदस्यांची आणि ८,२०६ मतदार असलेली मोठी ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता स्थापन होणार, यासाठी अवघ्या तालुक्याचे लक्ष विसापूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या घडामोडीकडे लागले आहे.
या निवडणुकीत दोन दाम्पत्य व आई-मुलगा रिंगणात उतरल्याने ही निवडणूक रंगतदार झाली आहे.
माजी सरपंच भारत जीवने व त्यांच्या पत्नी मावळत्या ग्रामपंचायत सदस्य शशिकला भारत जीवने अनुक्रमे प्रभाग क्रमांक ४ व प्रभाग क्रमांक ५ मधून उभे आहेत. चाणाक्ष बुद्धीचे मुरब्बी राजकारणी सरपंच, उपसरपंच पदाचा अनुभव असलेले जीवने काय घडामोडी घडवून आणतात, याकडे गावातील राजकीय मंडळीचे लक्ष लागले आहे. तर दुसरे दाम्पत्य अशोक थेरे व त्यांच्या पत्नी रंजना अशोक थेरे रिंगणात उभे आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधून पती व प्रभाग क्रमांक ६ मधून पत्नी उभी आहे. पत्नी यापूर्वी पंचायत समिती सदस्य होत्या तर पती ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांनी आपल्या नेतृत्वात यापूर्वी तीन उमेदवार निवडून आणले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ते विजयासाठी कोणते निर्णायक डावपेच खेळतात, हे १५ तारखेनंतर सिद्ध होईल. या निवडणुकीत दोन्ही दाम्पत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रदीप गेडाम व त्यांच्या आई अनुक्रमे प्रभाग क्रमांक ४ व ६ मधून उभे आहेत. त्यांच्यासाठी युवा नेतृत्व सिद्ध करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. तसेच माजी सरपंच बंडू गिरडकर हे प्रभाग क्रमांक १ मधून उभे आहेत. त्यांचीसुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शासनाने सरपंच पदाचे आरक्षण न सोडविल्यामुळे सर्वच उमेदवाराला या निवडणुकीत सरपंच पदाचे डोहाळे लागले आहे. त्यामुळे निवडणुकीत सगळेच उमेदवार उत्साहात आहेत.
सहाही प्रभागामध्ये बहुरंगी लढतीचे चित्र दिसत असल्याने गावातील दिग्गजांनी आपापले पॅनल उभे करून निवडून येण्यासाठी दंड थोपटले आहे. उमेदवार विजयश्री खेचून आणण्यासाठी घरोघरी जाऊन मताचा जोगवा मागत आहेत.