भद्रावती : तालुक्यातील चालबर्डी व शेगाव खुर्द येथील दोन शेतकऱ्यांना जमीन अधिक भावात विक्री करून देतो व गहाण ठेवून अधिक कर्ज मिळवून देतो, असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून भद्रावती पोलिसांनी दोन भामट्यांना अटक करून गुन्ह्याची नोंद केली आहे. चालबर्डी येथील नीळकंठ दशरू उपरे (६७) यांची तीन एकर शेती आहे. काही दलालांनी त्यांची भेट घेऊन शेतजमीन एकरी १० लाख रुपयेप्रमाणे विकून देऊ. त्यात तीन एकराचे तुम्हाला ३० लाख रुपये मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला पाच लाख रूपये देऊन इसारपत्र करू असे शेतकऱ्याला पटवून दिले. मात्र ठरलेल्या इसारपत्राच्या दिवशी शेतीचे इसारपत्र न करता यातील आठ जणांनी संगनमत करून परस्पर पाच लाखांत शेतीची विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केली. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून फसवणूक करणाऱ्या विजय कमलाकर पावडे, अंकुश आगलावे वरोरा, राजु उध्दव पिंपळकर, दिवाकर महादेव मत्ते, दादाजी भुसारी, गजानन महादेव पिंपळकर, मनोज नथ्थू कोपरे, प्रशांत देवराव ठेंगणे या आठ जणांवर भद्रावती पोलिसात ४२७, ३४ भादंवि गुन्हा दाखल केला आहे. तसेच शेगाव खुर्द येथील प्रल्हाद पाटील हा शेतकरी हा अर्धांगवायुने आजारी होता. त्याला उपचारासाठी कर्ज मिळून देतो म्हणून वरोरा येथील दलालाने शेती गहाण ठेवण्याच्या नावाखाली परस्पर शेतीची विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केली. उपचारासाठी कर्ज काढून देण्यासाठी वरोरा येथील सिद्धार्थ ढोके याने पुढाकार घेतला व एक लाख रु. आपणास उपचारासाठी देण्यात येईल. त्याकरिता आपल्याला शेती गहाण करावी लागेल, असे सांगितले. मात्र ठरलेल्या दिवशी आरोपीनी संगनमत करून शेती गहाण न करता शेतकऱ्याला विश्वासात न घेता, शेतीची विक्री केली. ही बाब शेतकऱ्याचा मुलगा विलास पाटील याला लक्षात येताच त्यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी उत्तम धोबे, विनोद फुलकर यांना अटक केली. (शहर प्रतिनिधी)
शेतविक्रीत फसगत करणाऱ्या दोघांना अटक
By admin | Updated: May 16, 2015 01:38 IST