सिंदेवाही ग्रामपंचायत : दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार बंद सिंदेवाही : सिंदेवाही ग्रामपंंचायतीमध्ये मागील दोन महिन्यांपासून प्रशासक बसले आहेत. दोन महिन्यात तीनदा प्रशासक बदलले. ग्रामपंचायत सचिव चौधरी यांचीसुद्धा रत्नापूरला बदली झाली. ग्रामपंचायत वाद न्यायालयात सुरू असल्यामुळे ग्रामपंंचायतीचे २३ पैकी नियमानुसार सहा कर्मचाऱ्यांचे पगार सुरू आहे. जवळपास १७-१८ कर्मचाऱ्यांचे पगार होत नसल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांवर उपासमारीची पाळी आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सिंदेवाही ग्रामपंचायत वाद न्यायालयात सुरू आहे. विरोधी सदस्यांनी न्यायालायत ग्रामपंचायत येथे नियमानुसार कर्मचाऱ्यांचा भरणा जास्त आहे. त्यांच्या पगारावर महिन्याचा तसेच वर्षाचा एवढा खर्च होतो. यावर न्यायालयात प्रकरण सुरू असल्यामुळे त्यांचा पगार होत नसल्याचे एका कर्मचाऱ्याने ‘लोकमत प्रतिनिधी’ जवळ आपली व्यथा कथन करताना सांगितले. मागील दोन महिन्यांपासून आर्थिक व्यवहार बंद असल्याने दैनंदिन कामे खोळंबली आहे. त्यामुळे शहरातील सहाही वॉर्डात कचऱ्याचे ढिग पडले आहे. नाल्याची सफाई झाली नाही. विद्युत दिवे बंद अवस्थेत पडले आहे. त्यामुळे सिंदेवाही ग्रामपंचायतीचे होणार तरी काय, यावर नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार बंद आहे. तरीही ते काम करीत आहे. दोन या तीन महिन्यात नगरपरिषद किंवा नगर पंचायत होईल, या आशेवर ते आहेत. त्यावेळी आपले पगार वाढेल किंवा समावेश होईल या आशेने ते काम करीत असल्याचे बोलले जाते. सिंदेवाही शहराची शोकांतिका अशी की सध्या येथील विकास कामाला संपूर्ण खीळ बसली आहे. एकही अधिकारी यावर बोलायला तयार नाही. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा ज्येष्ठ नागरिकांनी यावर तोडगा काढून सिंदेवाही ग्रामपंचायत पुर्वपदावर कशी येईल, यावर विचार मंथन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्याय सहन करणारे गाव म्हणजे सिंदेवाही, अशी पूर्वजांनी दिलेली उपमा खरी असल्याचे जाणवू लागले आहे. नागरिकांचे विकासाबद्दल काहीही देणे घेणे नाही. सिंदेवाही गामपंचायतीला ग्रहणातून मुक्त करणार कोण, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)
दोन महिन्यात तीनदा बदलले प्रशासक
By admin | Updated: July 2, 2015 01:30 IST