गोंडपिपरी : गेल्या तीन वर्षापासून ग्रामपंचायतीमधील उसणवारी व आर्थिक भ्रष्टाचाराचा सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे कारवाईत कुचराई केली जात आहे. नागरिकांना जागृत करण्याकरिता पत्रक काढून केलेला प्रकार हा नागरिक हक्क असून असा अधिकार प्रत्येक नागरिकाचा असल्याचे सांगत गोंडपिपरी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण ताबडतोब निकाली काढून सरपंच सचिवावर कारवाई करा, अशी मागणी स्थानिक तरुणांनी पत्रकार परिषदेत केली.मंगळवारी झालेल्या या पत्रकार परिषदेस गणेश डहाळे, संजय झाडे, साईनाथ मास्टे, अश्विन कुसनाके, विनोद वाघाडे, विनोद चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रपरिषदेत पुढे बोलताना गणेश डहाळे म्हणाले, गोंडपिपरीचे सरपंच सुनील डोंगरे, सचिव दिलीप शिंदे यांनी ग्रामपंचायतीमधील पर्यावरण समृद्धी निधीचा गैरवापर, मुरुमातील रकमेचा अपहार, सामान्य फंड, पाणी पुरवठा फंड या विविध विकास निधीतून मोठ्या प्रमाणात उसणवार घेऊन अनियमितता केली. शासन पत्रक १२ जून २०१३ अन्वये व्यवहारात अनियमितता करणे हा आर्थिक गुन्हा असून जबाबदार असणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे नमूद असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच सदर ग्रामपंचायतीवरील नागपूर आयुक्त (चौकशी) यांच्याकडे सादर केलेले प्रकरण गेल्या सहा महिन्यांपासून धूळखात आहे. सदर प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी केवळ तीन महिन्यांचा अवधी दिल्यानंतरही केवळ दप्तर दिरंगाईतून कारवाईत कुचराई केली जात असल्याचा आरोपही डहाळे यांनी केला.पत्रकबाजीचे आंदोलन हे जनजागृतीसाठी असून यात कुठलेही राजकीय षडयंत्र नसल्याचे सांगत सरपंच, सचिवांनी जनतेसमक्ष येऊन फेटाळलेल्या आरोपाचा आढावा द्यावा, असे आव्हानही गणेश डहाळे व सहकाऱ्यांनी केले आहे. गत तीन वर्षापासून सतत पाठपुरावा करूनही प्रकरण निकाली का काढण्यात आले नाही असा सवालही उपस्थित केला. (तालुका प्रतिनिधी)
पत्रकबाजीतून न्याय मिळविण्याचा प्रयत्न
By admin | Updated: February 22, 2015 01:01 IST