विद्युत तारा व घराचे नुकसान : सुदैवाने प्राणहानी टळलीगोंडपिंपरी : जड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने नियम धाब्यावर बसवून एकेरी मार्गावर भरधाव वेगाने जाण्याच्या नादात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक एका गृहस्थाच्या घरावर धडकला. यात विद्युत तारा, दुचाकी वाहन, टेलिफोन लाईन व घराच्या कंपाऊंड भिंतीचे प्रचंड नुकसान झाले. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास व्यंकटपूर मार्गावर घडली.सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूरवरुन येणारा सीजी-०४ सीवाय - २३३३ या क्रमांकाचा ट्रक रेल्वे रुळाचे जड साहित्य घेवून जाताना जुन्या बसस्थानक परिसरातून व्यंकटपूर मार्गावर वळला. ट्रक काही अंतरावर जाऊन पुष्पा ज्ञानेश्वर दांडेकर यांची संरक्षण भिंत तोडून घरानजीक आदळल्याने नागरिकांची भंबेरी उडाली. नागरिकांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली. सदर ट्रक घरावर आदळण्यापूर्वी विजेचे तीन खांब, जिवंत विद्युत तारा, टेलिफोन लाईन तोडून घर आवरातील दुचाकीला धडक बसल्याने प्रचंड नुकसान केले. यावेळी घरमालक पुष्पा दांडेकर या अंगणात असल्याने ट्रकचा आवाज येताच त्यांनी घरात धाव घेतल्याने सुदैवाने प्राणहाणी टळली. याबाबत गोंडपिंपरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहन चालकाला ताब्यात घेतले असून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. (तालुका प्रतिनिधी)
जड वाहतूक करणारा ट्रक घराला धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 00:36 IST