विरोधकांच्या हाती कोलीत : १० वर्षांपूर्वीच फाईल झाली होती नामंजूरचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला वारंवार वाचा फोडून जनचर्चा घडविणारे महानगर पालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर स्वत:च टॉवरच्या वादात गुंतण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती रामू तिवारी यांनी मनपाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. त्यात, नागरकर यांच्या घरावर लावण्यात आलेल्या मोबाईल टॉवरची फाईल नामंजूर असूनही त्यांच्या घरावर टॉवर लावण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. या अवैध टॉवरच्या मुद्यामुळे नागरकर यांंच्या विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १० वर्षांपूर्वी नंदू नागरकर यांनी आपल्या घरावर जीटीएल कंपनीचा मोबाइल टॉवर लावला होता. हा टॉवर लावण्यापूर्वी तत्कालिन नगर पालिकेकडे प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र नगर पालिका प्रशासनाने मंजुरी दिली नव्हती. घरावर मोबाइल टॉवर लावल्यामुळे त्याचे भाडे नागरकर यांना मिळत आहे. एवढेच नाही तर, नंदू नागरकर यांच्याकडून तत्कालिन नगर पालिका कर घेत होती. आता मनपाही वार्षिक २४ हजार ९०० रूपयांचा कर घेत आहे. मात्र आजवर सुरळीत सुरू असलेला हा प्रकार आता माहितीच्या अधिकारातील माहितीमुळे नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. मागील काही काळापासून रामू तिवारी आणि नंदू नागरकर हे दोन्ही नेते मनपातील राजकीय विषयावरून आमनेसामने आले आहेत. त्याची परिणती अनेकदा मनपाच्या सभागृहातही आली आहे. टॉवरच्या मुद्यावरून रामू तिवारी यांनी नागरकर यांना लक्ष्य केले आहे. तिवारी यांच्या अर्जावरून मनपा प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी सतीश रेंगे यांनी दिलेल्या लेखी माहितीमध्ये नागरकर यांच्या घरावरील टॉवरची फाईल नामंजूर असल्याचे म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)टॉवरला कंपनीकडून मंजुरी: नागरकरया संदर्भात विचारणा केली असता नंदू नागरकर म्हणाले, टॉवर बेकायदेशिर उभा असल्याचा आरोप खोटा आहे. मागील १० वर्षांंपासून टॉवर घरावर आहे. ९ जुलै २००७, २०१४ व त्यानंतर २०१५ मध्ये मनपाकडे आपन टॉवरच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. त्या सर्व प्रती मनपाकडे आहे. कंपनीच्या मंजुरीनंतरच तो लावण्यात आला. टॉवर अवैध असता तर तत्कालिन नगर पालिकेने आणि आतच्या मनपाने कर कसा घेतला असता, असा प्रश्न त्यांनी केला.दुसरीकडे बोट दाखविण्यापूर्वी स्वत:कडे बघा : तिवारीया संदर्भात रामू तिवारी म्हणाले, माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीवरून सत्य काय ते पुढे आले आहे. त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखविण्यापूर्वी आपण स्वत: कसे आहोत, हे बघायला हवे. महानगर पालिकेतून दुसऱ्यांवर आरोप करणाऱ्या नागरकरांनी आता या संदर्भात नागरिकांना उत्तर द्यायला हवे.
बेकायदा उभारलेल्या टॉवरमुळे नागरकर अडचणीत
By admin | Updated: June 22, 2016 01:10 IST