पोंभुर्णा : पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द-थेरगाव या मुख्य रस्त्यालगत असलेल्या पहाडावर समपातळीवरून वृक्ष लागवड केल्यास परिसरामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल व त्या ठिकाणातील दगड व मुरूमाची अवैध वाहतूक होणार नाही, असे मत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी व्यक्त केले. याबाबत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पोंभुर्णा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासाठी मंगळवारी या परिसरात आले असता, त्यांनी थेरगाव मार्गावरील पहाडाला भेट दिली. त्याप्रसंगी बोलत होते.देवाडा खुर्द - थेरगाव या मुख्य रस्त्याला लागून वनविभागाची २० हेक्टर जागा आहे. यामध्ये तीन डोंगर आहेत. त्यातील दोन डोंगरांच्या परिसरात वनविभागाने सागवन वृक्षांची लागवड केली आहे, तर मुख्य रस्त्यालगत असलेल्या डोंगरावर आणि आजुबाजुच्या परिसरामध्ये मोकळी जागा आहे. त्याठिकाणी वृक्ष लागवड केली नसल्याने काही ठेकेदार रात्रीच्यावेळी दगड मुरूमाची अवैधरित्या चोरी करतात. त्याठिकाणी वृक्षच नसल्याने वन विभागाचे कर्मचारीसुद्धा फिरकून पहात नाही. परिणामी त्या ठिकाणी समतल करून वृक्षांची लागवड केल्यास वनविभागाचा त्यावर अंकुश राहील आणि अवैध उत्खनन होणार नाही. यासाठी आपण वनविभागाचे चंद्रपूर जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन दिले असल्याचे प्रकाश देवतळे यांनी सांगितले.यावेळी त्यांचे समवेत देवाडा खुर्द येथील कार्यकर्ते राजु बुरांडे, विलास बुरांडे, गणेश घुघुस्कर, मनोज चांद, नीळकंठ घोंगडे, मनोहर पिपरे, आदी होते. (तालुका प्रतिनिधी)
पहाडावर वृक्ष लागवड आवश्यक - प्रकाश देवतळे
By admin | Updated: September 11, 2015 01:18 IST