मंगेश भांडेकर - चंद्रपूरदिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या व नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास यामुळे ग्लोबल वार्मिंगसारखे अनेक विषय मुळ धरु पाहत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गांवाची निर्मीती करणे ही काळाची गरज झाल्याने शासनाने वृक्ष लागवड योजना सुरु केली. पर्यावरणीय संतुलन राखून गावाचा शाश्वत विकास हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. मात्र, या योजनेच्या मुळ उद्देशालाच ग्रामपंचायतींनी हरताळ फासली आहे. वृक्ष लागवडीच्या नावाखाली केवळ निधीची उचल केली जात असून लावलेली किती वृक्ष जगली याची साधी आकडेवारीही प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.१०० कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले. उद्दीष्टानुसार ग्रामपंचायत प्रशासनाकडून रोजगार हमी योजना, १३ वा वित्त आयोग, पर्यावरण संतुलीत, ग्रामनिधीच्या माध्यमातून वृक्ष लागवड केली जात आहे. दरवर्षी खड्डे खोदून वृक्ष लागवड होत असली तरी जगलेल्या वृक्षांचा पत्ता नाही. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन आपण शासनाच्या वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ पुर्ण केल्याचे सांगत असून परिस्थीती मात्र, फार वेगळी आहे. रस्त्याच्या दुतर्फा खड्डे खोदून वृक्ष लागवड करण्यात आले. मात्र, लावलेले झाड जगविण्यासाठी उपाययोजना तोकड्या पडत आहेत. काही ठिकाणी नुसते खड्डे दिसत आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत २०१३-१४ मध्ये केलेल्या वृक्षलागवड संदर्भात जगलेल्या झाडांची माहिती मागितली असता, तालुका प्रशासनाकडून आकडेवारी प्राप्त व्हायची आहे, असे सांगितल्या जात आहे. १०० कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्याला १४ लाख ६४ हजार ९६५ वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले. यापैकी ३० जानेवारी २०१५ पर्यंत ४८९ ग्रामपंचायतींमार्फंत ५ लाख २३ हजार ७४१ वृक्ष लावण्यात आल्याची नोंद असून लागवडीसाठी ७ लाख ६३ हजार ५४ खड्डे खोदल्याचीही प्रशासनाकडे नोंद आहे. ही प्रक्रिया अद्यापही सुरुच असली तरी जगलेल्या झाडांचा मात्र पत्ता नाही.
वृक्ष लागवड योजना खड्ड्यात
By admin | Updated: February 2, 2015 23:02 IST