तहसीलदारांनी केली वाहनांवर दंडात्मक कारवाई : १३ लाख ५३ हजार ६०० रुपये दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असल्यामुळे कंत्राटदार महसूल प्रशासनाचा परवाना घेऊन काम करत आहे. मात्र, दिलेला परवाना त्याचदिवशी त्याच वेळेत वापरणे बंधनकारक असून, त्या वेळेनंतर परवान्याचा वापर होत असल्यास ते नियमबाह्य आहे. त्यामुळे अशा वाहनांवर राजुरा महसूल प्रशासनाकडून कारवाईचे धाडसत्र सुरु असून, नुकतेच राजुरा तहसीलदार हरिश गाडे यांनी वरोडा-साखरी मुख्य मार्गावर मुदतबाह्य परवाना असलेल्या वाहनांवर केलेल्या कारवाईत १३ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.
तालुक्यातील वरोडा-साखरी राज्य महामार्गावर मुरूम टाकण्याचे काम सुरु आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान पाटील अँड कंपनी यांच्या मालकीची एकूण पाच हायवा वाहने मुरुम उत्ख़नन करुन वाहतूक करताना आढळल्याने राजुरा तहसीलदार हरिश गाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाहनांची चौकशी केली असता, चालकासोबत असलेला वाहतूक परवाना मुदतबाह्य असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या वाहनांचा पंचनामा करुन वाहने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात स्थानबद्ध करण्यात आली असून, त्यांच्यावर दंडात्म़क कारवाई करण्यात आली आहे. एवढया मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले असून, अवैध वाहतुकीला यामुळे आळा बसणार आहे.
ही कारवाई नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, उपविभागीय कार्यालय नायब तहसीलदार डोणगावकर, तलाठी सुरेंद्र चिडे, राहुल श्रीरामवार, साखरी सजाचे कोतवाल मारोती मेश्राम यांनी केली.
कोट
तालुक्यात नियमबाह्य मुरूम उत्खनन असो की अवैध रेती वाहतूक असो, यावर नियमित कारवाई सुरू आहे. वरोडा-साखरी मार्गावर मुदतबाह्य वाहनांची वाहतूक होत असल्याचे पाहणीत दिसल्याने अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
- हरिश गाडे, तहसीलदार, राजुरा.