लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाघांची मोठे झालेले बछडे सीएसटीपीएसच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर तर आता पुढे इरई नदीच्या पात्रातून प्रवास करीत वडगाव, हवेली गार्डन, दाताळा, कोसाराच्या शिवारात तसेच मानवी वस्तीत येत आहेत. शहरालगत किंवा शहरी भागात असलेला वाघांचा वावर मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. यावर वेळीच उपाय योजना करण्याची मागणी, मानद वन्यजीव रक्षक, इको-प्रोचे बंडु धोतरे यांनी केली आहे.वाघांच्या स्थांनातरणाच्या प्रस्तावासंदर्भात शासनस्तरावर ही बाब गंभिरतेने घेण्याची गरज असून सदर मागणी वनविभागाचे प्रधान सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महानिरीक्षक राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, मुख्यवनसंरक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.मागील काही वर्षांपासून सीएसटीपीएस परिसरात बाभुळचे कृत्रीम जंगलामुळे तसेच परिसरात उपलब्ध पाणी व मोकाट जनावरांमुळे वाघांकरिता उत्तम अधिवास निर्माण झालेला असून सदर परिसर वाघिणीने पिल्लांना जन्म देणे व संगोपन करण्याच्या दृष्टीने स्वीकारलेला आहे. नैसर्गिक जंगल नसलेल्या औद्योगिक परिसरातील वाघांनी सदर अधिवास स्विकारणे आणी तिथेच वावरणे ही बाब भविष्यात धोकादायक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.काही दिवसांपासून इरई नदीकाठच्या वस्तीत वाघाचे अस्तित्व दिसल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वाघाच्या संभाव्य धोक्यापासून सुरक्षितेकरिता इरई नदीच्या दिशेने भागातील काटेरी बाभळीचे झुडुपसदृश जंगलाची सफाई करणे, प्रखर प्रकाशव्यवस्थेसोबत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.इरई नदीलगतच्या परिसरात वाघाचा वावर काटेरी झुडपामुळेचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात तसेच लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी बाभुळचे जंगल तयार झाले आहे. दाटी-वाटीने वाढणारी ही वनस्पती असल्यामुळे निर्माण होणारी जंगलसदृश अधिवास हा वन्यप्राण्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. या संपूर्ण परिसरात मोकाट जनावरांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात असून, येथे सतत वाहणारे नाले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना योग्य लपण, खाद्य आणी पाणी यामुळे वन्यप्राणी अधिवास निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती इरई नदीपात्रालगत असल्याने वाघाचा वावर नदीपात्रातही आहे. यात वडगाव, हवेली गार्डन, जगन्नाथ बाबा मठ तर दुसºया बाजुस दाताळा, कोसाराकडील शेतशिवाराचा भाग आहे. त्यामुळे काटेरी झुडपे तोडण्याची मागणी इको-प्रो ने केली आहे.
संघर्ष तीव्र होण्यापूर्वी वाघांचे स्थानांतरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST
वाघांच्या स्थांनातरणाच्या प्रस्तावासंदर्भात शासनस्तरावर ही बाब गंभिरतेने घेण्याची गरज असून सदर मागणी वनविभागाचे प्रधान सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महानिरीक्षक राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, मुख्यवनसंरक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
संघर्ष तीव्र होण्यापूर्वी वाघांचे स्थानांतरण करा
ठळक मुद्देप्रशासनाला इको-प्रोचे निवेदन : इरईलगचे झुडपे नष्ट करण्याची मनपाकडे मागणी