लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे. मात्र २०१४ पासून सुरु झालेल्या या केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या विविधांगी वस्तुंनी लक्ष वेधणे सुरु केले आहे. इतर लक्षवेधी शोभेंच्या वस्तूसोबतच प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेली बांबूची पर्यावरणपूरक सायकल चर्चेत आली असून ही कलाकृती लक्षवेधी ठरली आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रिम प्रोजेक्ट समजल्या जाणाऱ्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षणार्थ्यांनी अवघ्या दोन वर्षात या ठिकाणच्या अभिनव प्रशिक्षणातून महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या ठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना आगरतला (त्रिपूरा) येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांनी घरातील शोभेच्या, रोजच्या गरजेच्या वस्तुंसोबतच आता तंत्रज्ञानाची जोड देत अभिनव प्रयोग सुरु केले आहे. अशी आहे सायकल बांबूपासून तयार केलेल्या सायकलमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के बांबूचा वापर केला आहे. केवळ सायकलची चाके व तांत्रिक जोडणीच लोखंडी आहे. दीड महिन्याच्या परिश्रमातून संचालक राहुल पाटील यांच्या कल्पनेतील ही सायकल या संस्थेचे प्रशिक्षणार्थी किशोर मुरर्लीधर गायकवाड, अमोल झित्रुजी कोटनाके, शिवा नागा प्रसाद यांनी उभी केली आहे. बांबूची तणावक्षम शक्ती अधिक असते. तसेच बांबूच्या आतील लिग्नीनमुळे कंपनशोषणाला मदत होते. त्यामुळे थेट लोखंडापासून तयार होणाऱ्या सायकलीपेक्षा ही सायकल अधिक आरामदायी ठरते. लोखंडी सायकलीच्या तुलनेत ही सायकल हलकी असून दिसायला अधिक सुंदर आहे. या प्रशिक्षणार्थ्यांनी आणखी काही सायकलींचे मॉडल तयार करण्याचे मनोगत व्यक्त केले आहे. या सायकलीच्या आवश्यक चाचणी आणि मान्यतेनंतर एका जाहीर कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सायकलचे अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केली बांबूपासून सायकल
By admin | Updated: June 1, 2017 01:20 IST