अनुपकुमार : ई-प्रशासनात जिल्हा अग्रेसरचंद्रपूर : चंद्रपूर येथील विभागीय प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित अधिकारी तयार होणार असून या अधिकाऱ्यांचा उत्तम सेवा देण्यासाठी शासनास व नागरिकास उपयोग होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण हा या केंद्राचा महत्वाचा उद्देश असणार असल्याचे मत विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी व्यक्त केले आहे.यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी अमरावती यांच्यासोबत सामंजस्य करार करुन चंद्रपूर येथील तलाठी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी विभागीय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले. या केंद्राला विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी आज रविवारी भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.शासन व प्रशासनातील कामकाजात नेहमीच नवनवे बदल होत असतात. महाराष्ट्र शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आपल्या कामकाजात अंगीकारला असून या नव्या पद्धतीने कामकाज करुन नागरिकांना जलदगतीने सेवा मिळणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षीत अधिकारी- कर्मचारी आवश्यक आहेत. विभागीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित अधिकारी तयार करण्याचे काम होणार आहे. ई प्रशासनाचा अनुभव असलेले व्याख्याते या केंद्रात प्रशिक्षण देणार आहेत. शासनाच्या सर्व सेवा आॅनलाईन झाल्या असल्याने अशा प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता होतीच. ती आता पूर्ण झाली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. चंद्रपूर जिल्हा ई- प्रशासनात विभागात अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. कोरपना तालुक्यात ई- सातबारा व ई- फेरफार देण्यास सुरुवात झाली आहे. ही बाब अभिनंदनीय असल्याचे नमूद करुन विभागीय आयुक्त म्हणाले, डिसेंबरअखेरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. अभिलेख्याचे स्कॅनिंग करण्याचे अतिशय महत्वपूर्ण कामही हाती घेण्यात आले आहे. यामुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे सर्व दस्ताऐवज सुरक्षित ठेवण्यास मोलाची मदत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व तलाढ्यांना लॅपटॅप वाटप करण्यात आले असून त्याचा उपयोग पेपरलेस कार्यालय करण्यासाठी होणार आहे. सातबाराचे संगणकीकरण करण्यातही चंद्रपूर जिल्हा अग्रक्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले .शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वसा घेतला असून लोकाभिमुख सेवा देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. विभागीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना यापुढे प्रशिक्षणासाठी पुणे किंवा अमरावती या ठिकाणी जावे लागणार नाही. ती सोय चंद्रपूर येथेच उपलब्ध होणार आहे.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित अधिकारी तयार होतील
By admin | Updated: August 3, 2014 23:17 IST