राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : अधीक्षक अभियंता यांना निवेदनचंद्रपूर : पडोली-घुग्घुस-वणी- कारंजा या रस्त्याच्या चौपदीरकरणाचे कार्य मागील काही वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. मात्र धानोरा ते लहान पांढरकवडा दरम्यान टोलनाका बसविण्याचे कार्य युद्धस्तरावर सुरू असून चालु असलेले काम बघता लवकरच टोल वसूलीला सुरूवात होण्याचा अंदाज आहे. हा टोल नाका सुरू करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनातून केली आहे.पडोली-घुग्घुस-वणी-कारंजा या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून पाणी टँकी घुग्घुस, नवीन बसस्थानक ते राजीव रतन दवाखान्यापर्यंत रस्त्याचे कार्य मागील दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्यावर जागोजागी गिट्टी व गदड माती विखुरलेली आहेत. तसेच हा मार्ग पुणे-यवतमाळ-अमरावतीसाठी मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. स्थगित असलेले रस्त्याचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करून राजीव रतन ते प्रियदर्शिनी कन्या विद्यालयापर्यंत प्रत्येकी २०० मिटर अंतरावर गतिरोधकांची निर्मिती करणे, घुग्घुस तसेच परिसरातील ग्रामीण क्षेत्रातील युवकांना टोल नाक्यावर रोजगारांची संधी उपलब्ध करून दिल्याशिवाय टोल वसुलीला सुरूवात करण्यात येवू नये, अशी मागणी केली आहे. टोल नाका सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांना देण्यात आला आहे. शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, किसान सेल जिल्हाध्यक्ष सुरेश रामुगुंडे, घुग्घुस श्रीनिवास गोस्कुला, कामगार नेते सय्यद अनवर, युवक शहराध्यक्ष घुग्घुस दिलीप पिटलवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष सुजीत उपरे यांचा समावेश होता. (स्थानिक प्रतिनिधी)
पडोली ते कांरजा रस्त्यावरील टोेलवसुली सुरू करण्यात येऊ नये
By admin | Updated: September 9, 2016 00:55 IST