पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील कवडजई शिवारात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्याने सबंधित परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या शेतात अनेक कामे पडलेली आहेत. काही शेतकऱ्यांना शेतमजूर शेतात कापूस वेचण्याकरिता न्यावे लागतात, तर काही शेतकरी पेरणी, डवरणी, खुरपणीसाठी शेतात नित्य नियमाने जात आहेत.
तसेच या परिसरात कृषिपंपाचे भारनियमन असल्यामुळे अनेक शेतकरी जीव धोक्यात घालून शेतात रात्री पाणी देण्याकरिता जात असतात. परंतु आता सतत आठ दिवसांपासून वाघाच्या पायाचे ठसे आढळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वाघाच्या भीतीपोटी मजूर शेतात काम करण्यासाठी तयार नाही. काही शेतकरी पाणी देण्याबरोबर पिकाचे रक्षण करण्याकरिता शेतात मचान बांधून जागर करीत आहेत. त्यांनाही कधी आपला सामना वाघाशी होईल, याची भीती निर्माण झाली आहे. तसेच या परिसरात अस्वलही असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हा परिसर नाल्याला लागून असल्यामुळे व वाघाला पाणी मिळत असल्यामुळे हा वाघ जागा सोडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
याकडे वन विभागाने लक्ष देऊन संबंधित परिसरात कॅमेरा लावून त्या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.