सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : मूल शहरात इको-पार्कचे भूमीपूजन मूल : चंद्रपूर आणि गडचिरोली जिह्यातील वने ही मोठी संपत्ती आहे. ताडोबा आमची शक्ती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ताडोबा आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभयारण्य होईल याची काळजी आम्ही घेत आहोत. मूल शहरात उभारण्यात येत असलेल्या इको-पार्कच्या माध्यमातून शहराच्या विकासात भर पडेल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मूल शहरात खनिज विकास निधीच्या माध्यमातून मंजूर महत्त्वाकांक्षी इको-पार्कचे भूमीपूजन बुधवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. विविध विकासयोजना राबवून येणाऱ्या काळात मूल शहराचा सर्वांगिण विकास करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष रिना थेरकर, उपाध्यक्ष प्रविण मोहुर्ले, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे तसेच जि.प. सभापती देवराव भोंगळे, नंदू रणदिवे, वर्षा परचाके आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.इको-पार्कमुळे मूलच्या विकासात अधिकच भर पडणार आहे. चंद्रपूर येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने भूमीपूजन करण्यात आलेल्या भव्य उद्यानाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनी केले. त्याच पध्द्तीने पुढच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी याही पार्कचे उद्घाटन होईल, याची मला खात्री आहे असे ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. प्रारंभी इको-पार्कचे कोनशिला पूजन झाले. त्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुवर्णा गुहे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)उद्यानाच्या रूपात रोजगार मिळणारडॉ. श्यामाप्रसाद मुनगंटीवार जन-वन विकास योजना या भागात रोजागार वाढावा यासाठी अंमलात आणली आहे. विभिन्न ५५ हजार वृक्ष प्रकारांचा जीवंत इतिहास येथे उद्यानाच्या रूपात विकसीत करताना योगगुरू रामदेव बाबा यांच्या सहकार्याने येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी आखणी आपण केली आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. तलावाचे होणारसौंदर्यीकरणउथळपेठ (गायमुख) आणि अजयपूर यांचाही विकास निसर्ग पर्यटन योजनेत करण्यात येणार आहे. मूल ही माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांची कर्मभूमी आहे. त्यांच्या स्मरणार्थ ८ कोटी रूपये खर्च करून भव्य वास्तु उभारली आहे. याचे उद्घाटन तीन महिन्यात व्हावे असे नियोजन आम्ही केले आहे. सोबतच १ कोटी रूपये खर्च करून सुसज्ज वाचनालय येथे बांधण्यात येत आहे. मूल शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करताना सिंचन क्षेत्र आधी वाढवू, त्यानंतर नयनरम्य असे पर्यटन स्थळ येथे उभारू, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
इको-पार्कच्या माध्यमातून विकासात भर पडणार
By admin | Updated: August 20, 2016 00:45 IST