वरोरा : नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यात वरोरा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये तीन महिला दोन प्रभागांतून एकाच वेळी निवडून येऊन नवाच विक्रम केला आहे.
वरोरा तालुक्यातील दादापूर ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक २ नामाप्र (स्त्री) मध्ये विद्या सुधाकर खाडे निवडून आल्या आहेत. सोनेगाव ग्रामपंचायतमध्ये प्रभाग क्रमांक १ अनुसूचित जमाती व प्रभाग क्रमांक २ अनुसूचित जमाती स्त्री या दोन्ही प्रभागांत अरुणा कमलाकर कोचाळे विजयी झाल्या. महालगाव खुर्द येथील प्रभाग क्रमांक १ अनुसूचित जमाती स्त्री व प्रभाग ३ अनुसूचित जमाती स्त्रीमध्ये अनिता प्रशांत श्रीरामे विजयी झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच वेळी दोन प्रभागांतून निवडून येऊन या महिलांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. येत्या काही महिन्यांत दोन प्रभागांतून निवडून आलेल्या तीन महिलांना एका प्रभागाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्या रिक्त झालेल्या जागेवर परत निवडणूक घ्यावी लागेल.