खडसंगी : वनाचे संरक्षण व संवर्धन तथा ग्रामस्थांचा सहभाग वाढावा या उद्देशाने या वर्षापासून सरकारने ग्रामवन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गावाभोवती असलेल्या वनक्षेत्राचे सर्व अधिकार गावाला मिळतील, त्यामुळे ग्रामस्थांची वना विषयी आस्था वाढून वनाचे संरक्षण व संवर्धन होईल याच उदात्त हेतूने ही योजना अंमलात आली आहे. वनपरिक्षेत्र चिमूरअंतर्गत या योजनेसाठी शेडेगाव, पिटीचुआ, डोंगर्ला या गावाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामसभेद्वारे पाठविण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत गावाभोवती असलेले सर्व वनक्षेत्र गावाच्या हवाली केल्या जाणार आहे. वरील गावे आधीच संयुक्त वनव्यवस्थापन (जार्इंट फॉरेस्ट मॅनेजमेंट) योजनेत समाविष्ठ आहेत. या वनातून मिळणारे सर्व उत्पन्न त्या गावाला मिळणार आहे, तर वनव्यवस्थापनासाठी दरवर्षी प्रती हेक्टर १००० रुपये समितीला शासनातर्फे देण्यात येणार आहे. निवड झालेल्या गावातील ग्राम वन व्यवस्थापन समितीच्या सदस्याना जवळच्या वन प्रशिक्षण संस्थेतून पाच दिवसांचे वन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. वनातील कामाच्या म्हणजेच फळझाडाचे मोहासारखे बहुपयोगी झाडे तसेच वन्यजीवांच्या उपयोगांच्या झाडाचे संवर्धन करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.हे निकष पूर्ण करणाऱ्या संवर्धीत गावांना ग्रामसभेत ठरावासोबत आवश्यक ती छायाचित्रे व अहवालासह उपवन संरक्षकाकडे पाठवावा लागणार आहे. त्यानंतर तो अहवाल मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पाठविल्यानंतर त्या गावांची निवड करण्यात येणार आहे.ग्रामवन योजनेत समाविष्ठ असलेल्या गावातलाभार्थी निधीचा गैरवापर झाला किंवा ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय २० हजारापेक्षा अधीक खर्च सुक्ष्म आराखड्या व्यतिरिक्त केल्यास तथा वृक्षतोड व वन वणव्यास प्रतिबंध करण्यात ग्रामवन समिती अपयशी ठरल्यास वनविभाग त्या गावातील वनक्षेत्र आपल्या ताब्यात घेणार आहे. त्यामुळे सर्व निकष पाळणे बंधनकारक ठरणार आहे. (वार्ताहर)
ग्राम वन योजनेत चिमूर तालुक्यातील तीन गावे
By admin | Updated: July 7, 2014 23:28 IST