चंद्रपूर : केंद्र व राज्य सरकारच्यावतीने ‘गाव तेथे मैदान’, व्यायामशाळा आदी कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विविध योजना राबविल्या जातात. मात्र, पंचायत समिती युवा खेळ व क्रीडा अभियानांतर्गत आलेला निधी कागदोपत्रीच खर्ची होत असल्याने गाव तेथे मैदान या संकल्पनेचे तीनतेरा वाजले आहेत.शासनाच्यावतीने सुरू केलेल्या पायका पंचायत युवा खेळ व क्रीडा अभियानाचा निधी प्रत्येक तालुक्याला देण्यात आला. मात्र मैदानासाठी मिळालेला निधी कागदावरच खर्च झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आभ्यासाबरोबरच खेळाचे देखील शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने पंचायत युवा खेळ व जिल्हा क्रीडा अभियान २००८-०९ या सत्रापासून राबविण्यात येत आहे. यामध्ये ग्रामपंचायत पातळीवर सचिव व सरपंच यांना ई-क्लासच्या जमिनीवर अथवा शाळेच्या खुल्या जागेत मैदान तयार करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून एक लाख रुपयाचा निधी देण्यात आला आहे. मात्र यामध्ये प्रत्येक गावाला मिळालेल्या एक लाख रुपयाच्या निधीत काही ठिकाणी खोदकाम तर काही ठिकाणी कामाला साधी सुरूवातही झालेली नाही. क्रीडांगणासाठी एक फूट खोदकाम करून त्यामध्ये लालमाती ४० एम.एम.मेटल कोट, तारेची संरक्षण भिंत आदी कामे करायची होती; मात्र अनेक गावात थातुर-मातूर मैदान तयार करण्यात आले आहे. तसेच आलेल्या निधीची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाच्या गाव तेथे मैदानाला मूठमाती दिल्या जात आहे. या योजनेची चौकशी करण्याची मागणी आहे. याकडे लक्ष द्यावे. (स्थानिक प्रतिनिधी)
‘गाव तेथे मैदान’ संकल्पनेचे तीनतेरा
By admin | Updated: March 16, 2015 00:47 IST