लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीज वापराचे प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मेसह जून महिन्याचेही देण्यात आलेले तीन महिन्यांचे एकत्रित देयक स्लॅब बेनिफीटसह योग्य व अचूक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा अतिरिक्त भुर्दंड लावण्यात आला नाही, असा दावा महावितरणने केला आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज देयकांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देयक दुरूस्तीसाठी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन चंद्रपूर महावितरणने केले आहे.दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीज ग्राहकांसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. केवळ ग्राहक क्रमांक देऊन या लिंकद्वारे वीज बिलाचा संपूर्ण हिशोब व महावितरणकडून करण्यात आलेले ग्राहकांना वीजबिलांचे विश्लेषण पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. कोरोना विषाणूमुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे महावितरणकडून मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद ठेवण्यात आले होते. रिडींग बंद झाल्यामुळे लघुदाब ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात आले. शिवाय वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे मीटर रिंडीग पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला २ लाख ६५ हजार वीज ग्राहकांनी प्रतिसाद देऊन स्वत:हून मीटर रिडींग पाठविले. त्यांना वीज वापराचे अचूक मासिक देयक देण्याचे काम सुरू आहे. उर्वरित वीजग्राहकांना पाठविण्यात आलेले सरासरी वीज देयक दुरूस्त करण्यासाठी रिडींग घेणे आवश्यक होते. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १ जूनपासून स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागात मीटर रिडींग, वीज बिल वितरण व बिल भरणा केंद्र्र सुरू आहे. मीटर रिडींग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर वीज ग्राहकांना लॉकडाऊन कालावधी मधील एप्रिल, मे व जून महिन्याचे वीजबिल एकत्रित पाठविण्यात येत आहे. ग्राहकांनी आपल्या वीज देयकासंदर्भात अडचणी असल्यास वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे संपर्क साधावा, अशी माहिती महावितरणने दिली आहे.प्रत्येकी १०० युनिटला स्लॅब दरग्राहकांना जूनमध्ये ३.०७ महिन्यांचे ३०७ युनिटचे वीज देयक आले असेल तर एप्रिल, मे व जूनमध्ये प्रत्येकी १०० युनिटचा वीजवापर झाला आहे. मात्र जूनच्या बिलातील ३०७ युनिटला थेट ३०१ ते ५०० युनिट स्लॅब दर न लावता तीन महिन्यांच्या प्रत्येकी १०० युनिटला ० ते १०० युनिट स्लॅब दर लावण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंत वापरलेली युनिट संख्या दर्शवून ३१ मार्च २०२० पूर्वी जे वीजदर लागू होत तेच दर लावण्यात आले. लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीजवापर आणि १ एप्रिल २०२० पासून लागू झालेले नवीन वीजदर यामुळे एप्रिल, मे व जूनचे मासिक परंतु एकत्रित दिलेले वीज देयक अधिक युनिट व रकमेचे असण्याची शक्यता आहे, अशी माहिती महावितरणने दिली आहे.
वीज वापरातील तीन महिन्यांचे देयक अचूकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST
दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीज ग्राहकांसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वीज वापरातील तीन महिन्यांचे देयक अचूकच
ठळक मुद्देमहावितरणचा दावा : वीज ग्राहकांवर नाही अतिरिक्त भुर्दंड