कोट्यवधी रुपये पाण्यात : बळीराजाच्या जखमेवर प्रशासनाचे मीठगोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्रात गोंडपिपरी तालुका येतो. करोडो रुपये खर्चून गोंडपिपरी तालुक्यात सोनापूर टोमटा, किरमिरी, नंदवर्धन हे तीन सिंचन प्रकल्प २० वर्षापूर्वी उभारण्यात आले. पण अद्यापही कोणताही लाभ झालेला नाही. सदर सिंचन प्रकल्प धूळ खात आहेत. एकीकडे सिंचन प्रकल्पाचा लाभ नाही. दुसरीकडे मात्र गाळ काढणे, कालवे दुरुस्ती व इतर कामासाठी करोडो रुपये खर्च करण्यात येत आहेत. तेही पाण्याविनाच आहेत. त्यामुळे बळीराजाच्या साऱ्या अपेक्षा अधांतरी पडल्या. काही दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने बळीराजाचे कंबरडे मोडले जात आहे. अशावेळी सिंचन प्रकल्प कार्यान्वीत करणे गरजेचे आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंचन प्रकल्प धूळ खात पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यात संताप दिसून येत आहे. गोंडपिपरी तालुक्याच्या सिंचन मुद्यावर राजुऱ्यातील नेत्यांनी आमदारकी मिळविली. ही परंपरा आताचीच नसून फार काळापासून चालत आलेली आहे. आता विद्यमान आमदार अॅड. संजय धोटे हाच वारसा चालवित आहेत. तालुक्यात वर्धा, वैनगंगा, अंधारी या बारमाही वाहणाऱ्या तीन नद्या आहेत. वर्धा नदीवर उभारण्यात आलेले सिंचन प्रकल्प दिवास्वप्नच ठरले आहे. शिवनीजवळ ४७ हजार करोड रुपये खर्चून तेलंगणा सरकार प्राणहिता नदीवर प्राणहिता चव्वेला महाधरणाचे काम करीत आहे. या धरणाने संपूर्ण तेलंगणा सुजलाम् सुफलाम् होणार आहे. याउलट बारमाही तीन मोठ्या नद्या असूनही गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी उपेक्षितच आहेत. गेल्या १५ वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाले. त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशातच गेल्या महिन्यातील दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या ताज्या आहेत. तालुक्यातील शेतकरी निसर्गावरच अवलंबून आहे. सिंचन प्रकल्प रखडले असल्याने शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. मात्र प्रशासन मूग गिळून गप्प आहे. अशा स्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून सीमावर्ती भागातील बळीराजांना दिलासा देण्याचे काम आमदारांकडून अपेक्षित होते. मात्र त्यांचेही या मुद्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील आठ दिवसांपूर्वी गोजोली येथील युवकाने आत्महत्या केली होती. (शहर प्रतिनिधी)
गोंडपिपरी तालुक्यातील तीन सिंचन प्रकल्प धूळ खात
By admin | Updated: April 7, 2016 00:45 IST