धाबा : कासव तस्करी प्रकरणातील आरोपी हरीमोहन हलदर याला आज पोंभुर्णा न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला पोंभुर्णा दिवाणी व फौजदारी न्यायालयाने तीन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात तेलंगणातील बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तेलंगणातून कासव तस्करी करीत असताना हरिमोहन हजारी हलदर याला वनविकास महामंडळातील कर्मचाऱ्यानी हिवरा गावाजवळ पकडले. त्याचाकडून ४० कासव व दुचाकी ताब्यात घेण्यात आली. सदर कासव हैद्राबादेतून आणले असून मार्कंडा येथे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. मात्र कधी तेलंगणातील कागजनगर तर महाराष्ट्रातील नदी नाल्यातून कासव पकडले असल्याचे तो सांगत आहे. बयानातील तफावत बघता वनविकास महामंडळ धाबाचे वनपरिक्षेत्र अधिकारी उईके यांनी त्याला तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यावरून न्यायालयाने आरोपी हरिमोहन याला तीन दिवस वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपीकडून कासव तस्करीची महत्वपूर्ण माहिती मिळेल, अशी आशा वन विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांना आहे. दरम्यान, कासव सोडण्याची परवानगी अद्याप मिळाली नसल्याने ते ४० कासव वनविकास महामंडळाचा कार्यालयातच ठेवण्यात आले आहेत. त्यातील काही कासवांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. सोमवारी वनअधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली. (वार्ताहर)
कासव तस्करीतील आरोपीला तीन दिवसांची वनकोठडी
By admin | Updated: February 24, 2015 01:52 IST