देवाडा (खुर्द): पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास धनगे यांना मारहाण करणार्या तीन आरोपींचा पोलिसांनी शोध घेतला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.कासरगट्टा येथील रोशन नंदाजी कोवे या रुग्णास आजाराची लागण झाल्याने त्याला पोंभूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले.त्याच्यासोबत त्याचे काही नातेवाईसुद्धा होते. नातेवाईकांनी आरोग्य सेविकेशी अकारण वाद घातला. डॉ. धनगे हे तिथे पोहोचले. त्यांनी राकेश नंदु कोवे व इतर नातलगांची समजूत काढून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीच वाद घालून मारहाण करण्यात आली.त्यामुळे डॉ. धनगे यांनी सदर प्रकाराची तक्रार पोलीस ठाणे पोंभुर्णा येथे दिली. तक्रारीची दखल घेत पोंभूर्णा पोलिसांनी राकेश नंदू कोवे, नंदू बळीराम कोवे रा. कसरगट्टा, भीष्मा तुकाराम मडावी रा. देवई या तिघांचा शोध घेऊन अटक केली आहे. पुढील तपास पोंभुर्णा पोलीस करीत आहे. (वार्ताहर)
डॉक्टरांवर हल्ला करणार्या तीन आरोपींना अटक
By admin | Updated: May 8, 2014 01:46 IST