मूल : मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ४८ ग्रामपंचायतीतील ११० गावात सन २०१४-१५ या चालु वर्षात एक लाख नऊ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायतीला रोपे न मिळाल्याने फक्त नऊ हजार ६३५ रोपांची लागवड करण्यात आली. त्यामुळे पंचायत समितीने या वर्षात ठरविलेल्या शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या वतीने शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ या वर्षात ४८ ग्रामपंचायतीच्या गावात एक लाख नऊ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात नलेश्वर व आकापूर हे गाव वगळता उर्वरित ४६ गावात फक्त ५० हजार २३० खड्डे खोदण्यात आले. एकूण उद्दीष्टाच्या ५० टक्के खड्डे खोदण्यात आले खरे; मात्र रोपाची लागवड करताना रोपे नसल्याने ग्रामपंचायतीची भंवेरी उडाली. पंचायत समितीने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र तालुक्यात व परिसरातील गावात रोपे नसल्याने वृक्ष लागवडीच्या कामाला ‘ब्रेक’ लागला. खड्डे खोदलेल्या फक्त १३ गावात कशीबशी जुळवाजुळव करून नऊ हजार ६३५ रोपे लावण्यात आली. उर्वरित खड्डे खोदले असतानादेखील त्या गावात एकही रोपे लावण्यात आली नाही. यात चिरोली, खालवसपेठ, टोलेवाही, चिखली, बोरचांदली, नलेश्वर उथळपेठ, सुशी, दाबगाव मक्ता, केळझर, कोसंबी, काटवन, गांगलवाडी, मोरवाही, आकापूर, चितेगाव, गडीसूर्ला, उश्राळा, भादुर्णी, बोडाळा, नांदगाव, गोवर्धन, बोडाळा बु., ननेगाव भुजला, बाबराळा, भेजगाव, पिपरी दीक्षित, चिचाळा चक, दुगाळा, हळदी, डोंगरगाव, फिस्कुटी या ३२ गावांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या मते, तालुक्यात रोपे उपलब्ध आहेत. रोपे उपलब्ध आहेत तर ती गेली कुठे, हा प्रश्न आहे. आता वृक्ष लागवडीसाठी बाहेरील जिल्ह्यातून रोपाची आयात केली जाणार असल्याचेही कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एकंदरीत ‘वेट अॅन्ड वॉच’ ही भूमिका पंचायत समिती मूल घेणार असल्याने गावांना काही काळ वाट पाहादवी लागणार आहे.एकंदरीत रोपाअभावी मूल तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला ग्रहण लागले आहे. यामुळे पर्यावरण संतुलनावर परिणाम होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
उद्दिष्ट लाखांचे, लावले साडेनऊ हजार वृक्ष
By admin | Updated: September 13, 2014 01:12 IST