नवरगाव : ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. निवडणूक किंवा कोणतीही स्पर्धा म्हटले की, विजय-पराजय आलाच. निकालही लागले. विजय आपलाच होईल, या अपेक्षेत असलेल्या पराभूत उमेदवारांकडून आता पराभवाची कारणमीमांसा केली जात आहे.
जिथे दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकमेकांच्या विरोधात असतात, तिथे स्पर्धा सुरू होते. नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक लोकशाही पध्दतीने पार पडली. यामध्ये विविध राजकीय पक्षांसोबतच गटांनी आणि वैयक्तिक नागरिकांनी सहभाग घेतला. इतर स्पर्धेपेक्षा थोडी वेगळी, परंतु शासकीय, घटनादत्त अधिकारांवर आधारलेली मान्यताप्राप्त लोकशाही मार्गाने नुकतीच ही स्पर्धा संपन्न झाली. इतर स्पर्धेमध्ये व्यक्तीपुरती स्पर्धा असते. मात्र, निवडणुकीमध्ये स्पर्धेतील व्यक्तीसह इतर लोकांमध्ये, राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा असते. निवडणुकीच्या स्पर्धेचे निकाल नुकतेच लागले. जो उमेदवार निवडून आला. तो आणि त्याचे कार्यकर्ते आनंदी आहेत. तर जो उमेदवार हरला. तो व त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले असून आपला येणारा उमेदवार कसा पडला, याचा शोध घेतला जात आहे. मतदारांची पुन्हा पुन्हा गोळाबेरीज केली जात आहे. या पाडापाडीच्या राजकारणाचे परिणाम ग्रामीण भागात बरेच दिवस धुसफूसत राहतात. त्याचा दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम जाणवतो. म्हणून अलीकडे शासनाकडून ज्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल, अशा ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. निवडणूक कोणतीही असली तरी नागरिकांनी ती खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली तरच लोकशाही अधिक खोलवर रुजण्यास मदत होईल.