चंद्रपूर, पडोली, धानोरा मार्गाने येणारे जड वाहन वाहतूक नियमांचे उल्लंघन करून धावत असतात. त्यामुळे घुग्घुसकडून चंद्रपूरला जाणाऱ्या दुचाकी, जीप, कार, ऑटो व अन्य वाहनांचे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे घुग्घुस वणी रस्त्यावरील बसस्थानकाजवळ असलेल्या पेट्रोल-डिझेल पंंपावरून डिझेल- पेट्रोल भरून चंद्रपूरकडे जाणारी जड वाहने एकेरी नियमाची पायमल्ली करून विरुद्ध दिशेने जात असल्याने आपल्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होत आहे. नेहमी छोटे-मोठे अपघात होत आहेत. नियमाचे उल्लंघन करून रहदारीच्या ठिकाणी जड वाहने जात असतात आणि हा सर्व प्रकार वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत होत आहे. मात्र, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होत नाही. चंद्रपूर-घुग्घुस- वणी मार्गावर विविध ठिकाणी जड वाहने उभे राहत असल्याने दुचाकी वाहनचालकांना रहदारीसाठी त्रास होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागत आहे.
घुग्घुसमध्ये एकेरी वाहतूक नियमाचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST