बल्लारपूर : येथील विवेकानंद वॉर्डातील पान मटेरियलचे व्यापारी आपले दुकान बंद करून घरी जात असताना थोड्या दूरवर दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात युवकांनी त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले व त्यांच्या हातातील पिशवी घेऊन पसार झाले. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजता घडली.
व्यापारी हरिश ठक्कर हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी जाण्यास निघाले. तेवढ्यात मागून स्कूटरवरून दोन अज्ञात युवक आले व धक्का देऊन त्यांची पिशवी घेऊन पळू लागले. हरिश यांनी प्रतिकार केला असता त्यांनी त्यांना चाकूने जखमी केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन दोन तास आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले व फुटेज घेतले. त्या अज्ञात चोरट्यांचा तपास सुरू आहे. या संदर्भात ठक्कर यांनी सांगितले की, त्या पिशवीत पैसे नव्हते. परंतु पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे. पोलीस अज्ञात आरोपींच्या शोधात आहे.