मात्र चर्चेला ऊत : रेल्वे स्टेशन परिसरातील घटनाभद्रावती : येथील रेल्वे स्टेशन परिसरात काही अज्ञात इसम रात्रीच्या वेळी विशिष्ट जागी खोदकाम करीत असल्याचे दिसल्याने त्याठिकाणी चोरीचा माल पुरवून ठेवला असावा असा संशय आला. भद्रावती पोलिसांनी रेल्वे पोलिसांची परवानगी घेऊन जेसीबीद्वारे त्याठिकाणी खोदकाम केले असता काहीच आढळले नसल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. मात्र नागरिकात वेगवेगळ्या अफवांच्या चर्चेला पेव फुटले आहे.अज्ञात इसमाने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे त्याठिकाणी सुरुवातीला पोलिसांची पाळत ठेवण्यात आली. सांगितलेल्या माहितीनुसार काही अज्ञात इसम रेल्वे परिसरातील ट्रॅक स्लीपर साईडिंग या भागातील स्लीपर ठेवलेल्या जागेच्या खाली खोदकाम करीत होते. त्यांना पकडण्यासाठी पोलीस धावले असता ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत. त्यांच्या या कृत्यामुळे या ठिकाणी चोरीचा माल दडविला असावा, असा संशय आला. स्थानिक पोलिसांनी रेल्वे पोलिसांची परवानगी घेऊन जेसीबीद्वारे खोदकाम सुरू केले. खोदकाम ३० आॅगस्टला दुपारी १२ वाजतापासून सुरू होऊन ३१ आॅगस्टला दुपारी १ वाजता थांबले. दरम्यान मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे काही काळ खोदकाम थांबविण्यात आले होते. खोदल्यानंतरही पोलिसांना काहीच हाती लागले नाही. मात्र परिसरात वेगवेगळ्या चर्चेला ऊत आला आहे. कधी पैसे मिळाल्याची तर काही ठिकाणी मानवी सापडा मिळाल्याचीही चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी चालत्या रेल्वेमधील पैश्यांच्या बोगीच्या छताला कापून जी रक्कम लंपास केली, ती मिळाली. या कामासाठी चैन्नईचे पोलीससुद्धा दाखल झाल्याची चर्चा आहे. यासह इतर चर्चेलाही पेव फुटला आहे. मात्र ही कारवाई करणारे ठाणेदार विलास निकम यांनी सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगितले. या कारवाईत आम्हाला काही मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
पोलिसांनी केलेल्या खोदकामात काहीच आढळले नाही
By admin | Updated: September 1, 2016 01:29 IST