लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २०१५ ओरिएंट ॲण्ड ओझस बायोटेक नावाची कंपनी व वर्कदंत सोयायटी वाडी, नागपूर येथे स्थापन करून काहींना एजंट म्हणून नोकरीला ठेवले. त्यांच्या ओळखीतल्या लोकांकडून कंपनीमध्ये आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून पैसे गुंतवणूक करायला लावले. या माध्यमातून दोन कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या चंद्रपुरातील पंकज पुरुषोत्तम फुलझेले (रा. गंजवार्ड) याच्या तब्बल तीन वर्षांनी स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्याला पालघर येथून अटक करण्यात आली आहे. पंकज फुलझेले याने सुरुवातीला गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर देऊन लोकांचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून लोकांनी २ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या बळी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक सेवानिवृत्तांचा समावेश आहे. काही दिवसानंतर त्याने व्याज देणे बंद केले. गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितले, तेव्हा फुलझेलेने व्याज वा मुद्दलही दिले नाही. अखेर काहींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. येथील रामनगर पोलिसांनी १५ एप्रिल २०१९ रोजी कलम ४२०, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. यानंतर पंकज फुलझेले हा कुटुंबासह फरार झाला. या प्रकरणाच्या तपासाची धुरा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यावर सोपवली. तांत्रिक तपासाअंती आरोपी पालघर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. या आधारे एपीआय जितेंद्र बोबडे व पोलीस हवालदार अभय मुर्तरकर यांना पालघरला रवाना केले. पंकज फुलझेले याला येथील लक्ष्मी लाॅजमधून ताब्यात घेण्यात आले.