जयंत जेनेकरलोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके लोटली. मात्र कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या जामगाववासीयांना आजही मूलभूत सुविधांपासूनच वंचित राहावे लागत आहे.माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेले, जामगाव हे जेमतेम २५ ते ३० लोकवस्तीचे आदिवासीबहुल गाव आहे. हे गाव बेलगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट आहे. या गावाला जाण्यासाठी धड पक्का रस्ताही नाही. दगडधोंडे व नाल्याच्या वाटेतून गावाला जावे लागते. रस्त्यात असलेल्या नाल्यावर पूल नसल्याने गावाचा पावसाळ्यात दरवर्षी संपर्क तुटतो. मात्र रस्ता व नाल्यावर पुलाची निर्मिती अद्यापही झाली नाही. तालुक्यातील गावागावात बऱ्याच सुविधा पोहोचल्या असताना, या गावात वीजही पोहोचली नाही. त्यामुळे त्यांना अंधारातच राहावे लागते आहे. मध्यंतरी सौरदिवे लावण्यात आले. तेही आज बंद अवस्थेतच आहेत. दोन कूपनलिकांच्या भरवशावर संपूर्ण गावाची तहान भागवली जाते आहे. गावातील एकाही अंतर्गत रस्त्याचे साधे खडीकरणसुद्धा झाले नाही. शैक्षणिक व आरोग्य व्यवस्थेची तर मोठी उणीव दिसून येते आहे. त्यामुळे या गावात किमान मूलभूत तरी सोयीसुविधा पुरवण्यात याव्यात, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ करीत आहेत. मात्र त्यांना दरवर्षी आश्वासनापलीकडे काहीच मिळत नाही.