लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : वने आपले जीवन तर फुलवतातच, यासोबत पर्यावरणाचे संतुलनही राखतात. वनाचे आपल्या जीवनात खूप निकटचे नाते आहे. जंगले आहेत म्हणूनच सर्व काही आहे. यामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी २१ मार्च जागतिक वन दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. बल्लारपूर वन परिक्षेत्रातील जंगलाची घनता वाढली आहे. हे वर्षभर रोपवाटिकेच्या माध्यमातून होत असलेल्या वृक्ष लागवडीतून दिसून येते. बल्लारपूर वन परिसरातील एकूण वनपरिक्षेत्र १५ हजार ५३८ हेक्टरमध्ये लागलेले वन, विभिन्न प्रजातीच्या वृक्षांनी बहरलेले आहे. याशिवाय विविध प्रकारच्या आजाराशी लढण्याची क्षमता असलेले ‘रानमेव्याचे वन’ वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या संकल्पनेतून साकारले असून मानोरा, उमरी, कवडजई येथे साडेबारा एकर पडक्या जागेवर १२ हजार ५०० मिश्र फळांची झाडे फळांनी बहरली आहेत.
रोपवाटिकाही बहरल्या बल्लारपूर वनपरिक्षेत्रात विसापूर, कारवा, उमरी, मानोरा या चार राऊंडमध्ये चार रोपवाटिका आहेत. यात बल्लारशाहचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली हायटेक रोपवाटिकामधून उत्तम दर्जेदार अशी रोपे तयार होत आहेत व वनक्षेत्र वाढविण्याकरिता त्याचा उपयोग होत आहे.
जंगल क्षेत्र कमी होण्याला बरीच कारणे आहेत. औद्योगिक क्षेत्रात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्व जनतेने वनाचे रक्षण केले पाहिजे. जंगलाबाबत आस्था ठेवली पाहिजे. त्यासाठी समितीच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम सुरू आहे.- संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह
विसापूर रोपवाटिका येथे १.५० लक्ष व या चालू वर्षात ५० हजार असे एकूण दोन लक्ष रोपे निर्मिती मनरेगा योजने अंतर्गत करण्यात आली. बल्लारशाह उप क्षेत्रांतर्गत वनक्षेत्र २७३७.७६७ हेक्टर आर इतके आहे. यामुळे जंगलाची निश्चितच वाढ होण्यास मदत होईल. - नरेश भोवरे, क्षेत्र सहायक,विसापूर