चंद्रपूर : मनपाच्या सर्वसाधारण सभेत विषय चर्चेला येण्यापुर्वीच मनपा आयुक्तांनी कामाच्या निवीदा काढल्या. आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन सोयीच्या एजन्सींना काम देत असल्याचा आरोप संजय अनेजा यांनी केला आहे. आयुक्तांनी काढलेल्या निवीदा रद्द न झाल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. संजय अनेजा यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, सहा सप्टेंबरला चंद्रपूर मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सभेत प्रस्ताव क्रमांक ७७ वर तज्ञ सल्लागारांशी रस्ता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, घनकचरा, व्यवस्थापन प्रकल्प अहवाल तयार करणे, शासन स्तरावर मान्यता घेणे याबाबत निर्णय घेण्याचा विषय ठेवण्यात आला होता. मात्र, सभेत विषय चर्चेला येण्यापुर्वी व विषय मंजूर होण्यापुर्वीच मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी आपल्या अधिकाराचे हणन करीत नागपूरच्या विभागीय वृत्तपत्रात चंद्रपूर महानगरपालिकेकरीता तज्ञ सल्लागाराचे पॅनल नियुक्त करण्याच्या मथळ््याखाली रस्ता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, घनकचरा या विषयावर तज्ञ सल्लागाराची समिती नेमण्याकरीता जाहिरात देऊन सभेच्या एक दिवसांपुर्वीच प्रकाशित केली. आमसभेने त्यासाठी आवश्यक अनुभव, अनामत रक्कम इत्यादी निश्चीत केले नसताना त्यापुर्वीच अनुभवाच्या रकान्यात पात्रता दर्शविली आहे. या पात्रतेमध्ये कोणतीही विशेष बाब किंवा वाक्यातून अर्थबोध होत नसल्याचे अनेजा यांनी म्हटले आहे. एक कोटीच्या उलाढालीने पात्रता स्पष्ठ होत नाही आणि तांत्रिक मनुष्यबळ कोणत्या पध्दतीचे व किती हे जाहिरातीत नमूद नाही. ही जाहिरात भविष्यात आपल्या सोयीनुसार मंडळीला इंटरटेस्ट करण्यासाठी काढल्याचे म्हटले आहे. अनामत रक्कम २५ रोख १५ सप्टेंबरला ४ वाजेपर्यंत भरण्याची अट, कामाचा कालावधी इत्यादी गोष्टी आमसभेत ठरायला पाहिजे होत्या. जाहिरातीत कंत्राटदार नेमणूक सुध्दा ती एजन्सी करेल असे नमूद आहे. कंत्राटदाराशी करारनामा करणे, योग्य सक्षम कंत्राटदाराची नेमणूक प्रक्रिया पार पाडणे, करारनामे करणे, निकषाप्रमाणे काम करुन घेणे, कामाचे आवश्यक यंत्रणेमार्फत तपासणी करून प्रमाणपत्र देणे ही कामे नियामाप्रमाणे अधिकाऱ्यांना करायची आहेत. मात्र, अधिकाराचे हणन करुन आयुक्तांनी आमसभेपुर्वीच या बाबी जाहीर केली. यावर एका नगरसेवकाने लेखी आक्षेप नोंदविल्यानंतर आचारसंहिता लागणार असल्याने जाहिरात प्रकाशित केल्याचे सांगितले. आचारसंहितेचा बाऊ करत मनपा आयुक्तांनी आपल्या अधिकाराचे हणन केले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा विकास व समस्या निवारण समितीच्यावतीने याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, असे समितीचे अध्यक्ष हरविंदरसिंह धुन्नाजी, सचिव संजय अनेजा, यशवंत दाचेवार, डॉ. पंदीलवार, महादेवराव लांडे, अॅड. आसिफ शेख, अरविंद मुच्चूलवार यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
चर्चेविनाच आयुक्तांनी काढल्या निविदा
By admin | Updated: September 13, 2014 01:16 IST