रुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)एकीकडे देश वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत होत चालला असला तरी देशाला समाजाला लागलेलेअंधश्रद्धेचे ग्रहण मात्र सुटलेले नाही. अशाच अंधश्रद्धेच्या आधिन झालेल्या समाजाला हेरण्यासाठी भोंदू तांत्रिक नवनवे मार्ग शोधतात. सध्या महामंडळाच्या बसेचमध्ये असेच काही तांत्रिक पत्रके लाऊन मंत्राद्वारे पूत्र प्राप्तीसह अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या जाहिराती करीत आहेत. हा नव्या कायद्यानुसार गुन्हा असला तरी पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अशी पत्रके महामंडळाच्या अनेक बसेसमधून झळकत आहेत. जादुटोणा, पूत्रप्राप्ती, न्यायालयीन प्रकरण, प्रेम प्रकरण तसेच अनेक प्रकारच्या समस्यांवर समाधान करुन देण्याचा दावा या पत्रकातून केला जात आहे. आणि दुदैवाने अशा दाव्यांवर विश्वास ठेवून लोक या भोंदू तांत्रिकांच्या जाळ्यात अडकून स्वत:चे नुकसान करून घेत आहे. शहरातील तुकूम परिसरातील रहिवासी आशिष (नाव बदलले आहे) नामक युवकाने भोंदू तांत्रिकाच्या संबंधित मोबाईल क्रमांकावर फोन करून आपली व्यथा मांडली असता, त्यालाही या बाबाने २५ हजाराने गंडा घातल्याची चर्चा आहे. असे अनेक तरूण या बाबाच्या नादी लागून स्वत:ची फसगत करून घेत आहे. भोंदूकडून समस्याग्रस्तांची अशा पद्धतीने फसवणूक केली जात असताना, पोलीस यंत्रणेचे या जाहिरातीकडे दुर्लक्ष होत असल्याने तांत्रिकाचे चांगलेच फावत आहे. समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी, यासाठी नवा कायदा करण्यात आला. या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी या कायद्याचा धाक अजुनही या भोंदूंना वाटत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपली दुकानदारी वाढविण्यासाठी या भोंदूंनी आता महामंडळाच्या बसेसचा आधार घेतला आहे. अनेक बसमध्ये अशा जहिराती प्रवाशांची नजर खिळवून ठेवत आहे. जाहिरातीमध्ये संबधित तांत्रिकाचे बनावट नाव अणि मोबाईल क्रमांकही देण्यात आला आहे. त्यामुळे अशा भोंदू बाबापर्यंत सहज पोहचता येणे शक्य होत आहे. त्यामुळे अशांची फसगत होत आहे.
महामंडळाच्या बसेसमधून तांत्रिकांच्या जाहिराती
By admin | Updated: June 15, 2015 01:10 IST