लोकमत न्यूज नेटवर्कमूल : एकेकाळी शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र, आजची परिस्थिती उलट आहे. शैक्षणिक वर्ष संपताच विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सुट्यांची पर्वणी लाभते. सध्या शाळांच्या गुरुजींना वर्गतुकड्या टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांचा शोध घेत भटकंती करावी लागत आहे. पालकांनी मुलाचे नाव आमच्या शाळेत टाकले पाहिजे म्हणून शाळेच्या महतीसह प्रलोभनही दाखविण्यात येत आहे.
सध्या शिक्षकांना सुट्या असल्या तरी रोज शिक्षक विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबवत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षक आपल्या संस्थेच्या उच्च शिक्षण व सुविधेची बतावणी करून पाल्यांना आकर्षित करीत आहे. मात्र, काही शाळांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेली असल्याने विद्यार्थी अन्य ठिकाणी शिक्षणासाठी जाणे पसंत करीत आहेत. शिक्षण संस्थांनी शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा केल्यास त्या शाळांत विद्यार्थ्यांचा निश्चितच कल वाढीस लागेल. वर्गतुकड्या टिकविण्यासाठी शिक्षक पालकांना गुणवत्तेचे धडे सध्या सांगत आहे. चौथीचा निकाल लागल्यापासून शिक्षक त्या शाळेसमोर ठाण मांडून आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकाकडे रोज येरझारा मारून प्रवेश मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न शिक्षक करताना दिसून येत आहेत. शहर, तालुका व गावातील काही खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षक आपली नोकरी टिकून राहावी म्हणून विद्यार्थ्यांच्या शोधात गावे पिंजून काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
संस्थाचालंकाकडून शिक्षकांना दिले टार्गेटजुन्या खासगी संस्थांच्या वर्गतुकड्यांची मंजुरी टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांची भरपाई करणे गरजेचे असते. विद्यार्थी मिळाले नसल्यास वर्गतुकड्या तुटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे शिक्षण संस्थेच्या संस्थापक मंडळींकडूनही विद्यार्थी मिळविण्याचे टार्गेट दिले जात असल्याचेही म्हटले जाते. त्यामुळे विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.